
पाठविलेले कुरिअर दिलेल्या पत्त्यावर पोहोचले की नाही यासाठी फोन केल्यानंतर सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला अॅप डाउनलोड करण्यास सांगून ऑनलाईनरित्या तब्बल 1 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने एका नामांकित कुरियर कंपनीमार्फत नाशिक येथे कुरियर पाठविले होते. काही दिवस झाल्यानंतर हे कुरियर पोहोचले का नाही याची चौकशी करण्यासाठी त्यांनी कुरियर कंपनीत फोन केला, पण त्यांचा फोन कोणी उचलला नाही. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने त्यांना फोन करू का ? म्हणून मेसेज आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना फोन केला. कुरियर कोठे आहे याची तपासणी करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘एनी डेस्क’ हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले.
त्यानंतर तक्रारदार यांना क्रेडीट कार्डवरून पाच रुपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या क्रेडीट कार्डची सर्व माहिती मिळविली. त्यानंतर क्रेडीट कार्डमधून 1 लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत मराठे तपास करत आहेत.



























































