लेख – माणूस आणि निसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी  

खरंतर माणूस हाच विराट निसर्गाचा एक अविभाज्य घटक असल्याने त्याचं वेगळेपण सांगण्याची गरज नाही; परंतु इतर प्राणी, कीटक आणि वनस्पतींप्रमाणे तो केवळ निसर्गाच्या उर्मीवर जगत नसल्याने त्याचं वेगळेपण दिसून येतं. बुद्धिमान असलेला माणूस इतर सजिवांप्रमाणे सहज निसर्गशरण होत नाही. वादळवारा, दुष्काळ, महापूर अशी संकटं आली तरी त्या आपत्तींशी तो झगडतो. अशा गोष्टींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आधीच उपाययोजना करू शकतो. तरीही निसर्गाची शक्तीच एवढी प्रचंड आणि व्यापक आहे की, अनेकदा मानवी प्रयत्न उधळून तो त्याचं बेबंद स्वरूप दाखवतो. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशी संकटं माणसाची परीक्षा घेतात तेव्हा विराट निसर्गावर ‘मात’ करणं तर अशक्यच असल्याने त्याला साथ देत सुखाने जगता येईल का यावर अधिकाधिक विचार व्हायला पाहिजे.

साधारण तीन-चार शतकांपूर्वी मानवनिर्मित यंत्रांची निर्मिती मर्यादित होती. पृथ्वीवरची वस्तीही खूपच कमी होती. तेव्हाचं जीवन जास्त निसर्गसन्निध होतं. शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने मातीशी घट्ट नाळ जुळली होती. पुढे काळ बदलला. आपण म्हणतो तशी ‘प्रगती’ झाली. यंत्रयुग बहरलं. रासायनिक तत्त्वांचा वापर वाढला. नित्यनव्या उत्पादनांसाठी आणि वाढत्या वस्तीच्या निवासासाठी, प्रवासासाठी माणसाने नैसर्गिक संसाधनांवर हळूहळू आक्रमण करायला सुरुवात केली. गेल्या पन्नास वर्षांत त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. विकास, प्रगती हवीच पण त्याचबरोबर नैसर्गिक समतोलही टिकवायला हवा. याची जाणीव उशिरा का होईना होऊ लागली. पण जाणीव झाली म्हणजे लगेच त्यादृष्टीने वेगवान कृती घडते असं नाही. बराच काळ चर्चेतच गेला. शेवटी ‘पॅरिस परिषदेत’ पर्यावरण रक्षणासंबंधीची काही पथ्य जगाने स्वतःहून पाळावीत असं ठरलं. अर्थात त्याची अंमलबजावणी किती होते हा एक वेगळाच विषय.

परवा 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस होता. ढासळत्या पर्यावरणाचं पुनरुज्जीवन असं या वेळचं बोधवाक्य. त्यानिमित्ताने मुळात पर्यावरणाचा ऱ्हास होताना काय घडतं त्याची काही उदाहरणं… खूप वर्षांपूर्वी मॉरिशसमध्ये आढळणाऱया ‘डोडो’ पक्ष्याविषयी वाचलं होतं. हा पक्षी आता अस्तित्वात नाही. त्याच्या नंतर मिळालेल्या सांगाडय़ावरून त्याचं स्वरूप मांडलं जातं. लांब पंखांचा, साधारण तीन फूट उंचीचा, तीस किलो वजनाचा… हा 1666मध्ये शेवटचा दिसला. असं म्हटलं जातं, त्याची शिकार करणारे प्राणी त्या काळी नसल्याने हा काहीसा सुस्त पक्षी सुखेनैव जगत होता; परंतु कालांतराने या बेटावर बाहेरची माणसं आली, त्यांची भूक मोठी… त्यासाठी या निरुपद्रवी पक्ष्यांसारखं भक्ष्य मिळाल्यावर डोडोंची संख्या वेगाने कमी होऊ लागली आणि मग जैविक साखळीतील एक सजीव संपला. केवळ याच पक्ष्याने खाल्लेल्या बिया नंतर पडून त्यातून वाढणारं कॅव्हेरिया किंवा टेम्बालाकोक हे झाडसुद्धा अस्तंगत व्हायची वेळ आली. अर्थात डोडोचा आणि या झाडाच्या उत्पत्तीचा तसा संबंध नाही असंही नंतर म्हटलं गेलं. परंतु एकूणच जैविक चक्र परस्परावलंबी असतं. एखाद्या ‘रेन फॉरेस्ट’मध्ये तीन घरांवर वेगवेगळे सजीव राहतात. तिथेच जन्मतात अणि नष्ट होतात. वरच्या घरातले माकडांसारखे प्राणी आणि ओलसर जंगलात जमिनीवर वाढणारे ‘बिटल’सारखे कीटक एकाच अरण्याचे घटक असतात.

गांधीलमाशी हा विषय घेऊन पीचडी केलेल्या डॉ. सुजाता देशपांडे यासंदर्भात म्हणतात, ‘‘निसर्गनिर्मित जैविक विविधता जपण्याचं काम माणसांचंच आहे. निसर्गतः नष्ट झालेल्याही अनेक प्रजाती आहेत. परंतु गेल्या शे-दीडशे वर्षांत माणसाच्या हव्यासापोटीच पर्यावरणाचा जो नाश होतोय तो निसर्गचक्र बिघडवतोय. सध्याचं वाढतं सर्वंकष प्रदूषण, अफाट जंगलतोड, यंत्रवापरातून होणारं कार्बन उत्सर्जन आणि स्वार्थासाठी दुर्मिळ प्राण्यांची होणारी शिकार या गोष्टी थांबवणं माणसाच्याच हातात आहे. मुंग्यांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन तर म्हणतात की, पृथ्वीवरचा किमान पन्नास टक्के भूभाग नैसर्गिक स्वरूपात ठेवला नाही तर पुढे माणसाचंच जिणं कठीण होईल. जंगलतोड करून आपण अनेक प्राण्यांची राहती जागा (अधिवास) नष्ट करतो. मानवी वस्ती अरण्यांवर आक्रमण करते किंवा इतर काही कारणांसाठी जंगलं नष्ट केली जातात. यातून वन्य जीव सैरभैर होऊन मानवी वस्तीत येतात. केवळ वन्य प्राण्यांपुरतेच सिमीत असलेले ‘एड्स’सारखे व्हायरस माणसापर्यंत पोचतात. त्यातून आवरता येणार नाहीत अशा साथी उद्भवू शकतात. जंगल वाचवणं ही फॅशन नव्हे तर ‘पॅशन’ (सखोल जाणीव) असली पाहिजे. आपल्याला या पृथ्वीवर सुखाने नांदायचं असेल तर जैवविविधतेमधले असंख्य जीव आणि वनस्पती यांना त्यांच्या जागी सुखाने जगू द्यायला हवं! डॉ. देशपांडे हे कळकळीने सांगतात. कारण त्यांनी गांधील माश्यांचा अभ्यास केलाय आणि जखमी खारींसारख्या प्राण्यांची सुश्रुषा करून त्यांना जीवदान दिलंय. आपल्यापुरतं पर्यावरण रक्षणचं काम आपण कोणीही करू शकतो. मात्र त्यासाठी त्याची जाणीव आणि जिद्द हवी.

[email protected]