लहान मुलांसाठी नऊ कोटींचे 33 व्हेंटिलेटर! संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असली तरी संभाव्य तिसऱया लाटेसाठी पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्यास सुरुवात केली आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांकडून देण्यात आल्यामुळे लहान मुलांसाठीचे 33 व्हेंटिलेटर 9 कोटी 27 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात येणार आहेत.

पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दोन लाटा आटोक्यात आल्या. मात्र दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आरोग्य तज्ञांकडून तिसऱया लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर रुग्णालयांसाठी 33 पेडियाट्रिक कम निओनॅटल व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रत्येक व्हेंटिलेटरसाठी पालिका 29 लाख 39 हजार रुपयांचा खर्च करणार आहे. या 33 व्हेंटिलेटरसाठी पालिका 8 कोटी 35 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. मुंबईत सध्या कोविड रुग्णांसाठी 1 हजार 480 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. दुसऱया लाटेत व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवल्याने पालिकेने आता व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बालकांसाठी स्वतंत्र कोविड केंद्र बनविले जाईल.

असा होणार खर्च

पालिकेने प्रत्येक मशीनसाठी 28 लाख 10 हजार रुपये या दराने अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र पात्र ठरलेल्या पुरवठादाराने 30 लाख 51 हजार रुपये दराने मशीन पुरविण्याची तयारी दाखवली. त्यामुळे पालिकेने या पुरवठादाराबरोबर वाटाघाटी केल्यावर 29 लाख 39 हजार रुपयांत हे मशीन पुरविण्याची तयारी दाखवली आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.