
राज्यात शुक्रवारपासून आरटीई प्रवेशाला सुरुवात होणार असून या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न देण्याचा निर्णय खासगी शाळा संस्थाचालकांनी घेतला आहे. 25 टक्के कोटा प्रवेशासाठी शाळांना देण्यात येणाऱया प्रवेशाच्या शुल्कात यंदा अर्ध्याहून अधिक कपात केल्याने हे प्रवेश देणार नसल्याची संस्थाचालकांची भूमिका आहे.
शालेय शिक्षण विभागाने मागील तीन आठवडय़ांपूर्वी आरटीई प्रवेशासाठी प्रती विद्यार्थ्यामागे देण्यात येणाऱया शुल्कामध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात कपात केली आहे. यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 17 हजार 500 रुपये शुल्क शाळांना मिळत होते. त्यामध्ये कपात करून ते थेट आठ हजार रुपये करण्यात आल्याने संस्थाचालक संघटनांमध्ये याविषयी तीव्र नाराजी पसरली आहे. अर्ध्यावर आणलेल्या शुल्कामध्ये आम्ही प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे, असा सवाल मेस्टा (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) या संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी केला आहे.


























































