लष्करी जवानांसाठी बनवले बॉम्बरोधक हेल्मेट; आयआयटी रुरकीमधील मराठी संशोधकाची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्करी जवान आणि कमांडोंना युद्धभूमीवर गोळ्यांचा वर्षाव आणि जीवघेण्या स्फोटकांचा सामना करावा लागतो. डोक्याला गोळी लागू नये म्हणून संरक्षक हेल्मेट असतेच, पण स्फोट झाल्यास निर्माण होणाऱया लहरी इतक्या शक्तीशाली असतात की, त्यामुळे डोक्याला गंभीर इजा पोहोचून मृत्यूही ओढवतो. या लहरींपासून संरक्षण करणारे बॉम्बरोधक हेल्मेट बनवण्याची कमाल एका मराठी संशोधकाने केली आहे. शैलेश गणपुले असे त्यांचे नाव असून ते उत्तराखंडमधील आयआयटी रुरकीमध्ये प्राध्यापक आहेत.

प्रा. शैलेश गणपुले हे मूळचे महाराष्ट्रातील असून आयआयटी रुरकीमध्ये मेकॅनिकल अॅन्ड इन्डस्ट्रियल इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक आहेत. बॉम्बरोधक हेल्मेट बनवल्याबद्दल त्यांचा ‘एनएसजी काऊंटर-आयईडी अॅन्ड काऊंटर-टेररिझम इनोव्हेटर पुरस्कार 2021’ देऊन नुकताच गौरव करण्यात आला. हरयाणातील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या उपलब्ध असलेले लष्करी हेल्मेट हे जवानांचे बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण करू शकतात, परंतु स्फोटापासून संरक्षण करण्यासाठी ते पुरेसे नाही. प्रा. गणपुले यांनी जवानांसाठी बनवलेले बॉम्बरोधक हेल्मेट ही त्याच पारंपरिक हेल्मेटची अद्ययावत आवृत्ती आहे. आयईडी स्फोटानंतर निर्माण होणाऱया शक्तीशाली लहरींपासून डोक्याचे संरक्षण करण्यास ते सक्षम ठरले आहे.