
नगर- मनमाड महामार्गावर विळद घाट येथे रविवारी दुपारच्या सुमारास कंटेनरने चारचाकी वॅगनआर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीतील दोनजणांचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र किसन पाटील (वय 45), मनीषा रवींद्र पाटील (42, दोघेही रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात नऊ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला आहे.
या धडकेत चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथून पाटील कुटुंब रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गाने पुण्याकडे जात असताना विळद घाट येथे आल्यावर समोरून कंटेनर येत होता. कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो पाटील यांच्या गाडीवर धडकला. या अपघातामध्ये पाटील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा रुग्णालयांमध्ये या दोन्ही व्यक्तींना नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. या अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा ऋषिकेश थोडक्यात बचावला आहे. एमआयडीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी व त्यांच्या पथकाने मुलाला सुखरूप बाहेर काढले.मुलाच्या डोक्याला जखम झाली असून त्याला डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. तर त्याचा साथीदार अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती पाटील कुटुंबीयांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.























































