कुडाळमध्ये मुसळधार पाऊस; दुकानवाड पूलावर पाणी, वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ तालुक्यात सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. माणगांव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांना पूर आला. दुकानवाड पूलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कुडाळ आगाराची शिवापूर बस दुकानवाड पूलाजवळ अडकून पडली. तर पावसामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

मृग नक्षत्रापासून तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी तालुक्यात मुसळधार पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. रात्रीही जोरदार पाऊस कोसळला. तसेच सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. शहरासह ग्रामीण भागात मान्सूनच्या जोरदार सरीवर सरी कोसळत होत्या. माणगांव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला. नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसाने विहीरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली आहेत.