
घरफोडीच्या गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींना चंदननगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून 44 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. सुमित मोहन शिंदे (वय 22,रा. राजीव गांधी नगर,येरवडा ) आणि ऋतिक दत्ता सारगे (वय 19 , रा. सुरक्षानगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी चंदननगर भाजी मंडई शिवाजी पुतळा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना मिळाली होती. त्यानूसार पोलीस साध्या वेशात आले आणि सापळा रचला. त्यांना संशयीत आरोपी दुचाकीवर दिसताच पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, आरोपी पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना काही अंतरावरच पकडले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत 44 हजार रूपये किंमतीचे दागिने आढळले आहेत. ते जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, युसुफ पठाण, राजेश नवले, अमित जाधव, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांच्या पथकाने केली.































































