किडनीला ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णाला मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत घातक ठरलेल्या ब्लॅक फंगस तथा म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी गेले. ब्लॅक फंगसची नाक, डोळे व मेंदूला लागण होते. परंतु, किडनीला याची लागण झाल्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या एका 55 वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळला. त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये किडनी विकारतज्ञ डॉ. आनंद काशिद यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागताच, ब्लॅक फंगसने हातपाय पसरायला सुरुवात केली. यामध्ये आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. रुग्णांना ब्लॅक फंगसची किडनीला याची लागण होण्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरमधील एका महिला रुग्णामध्ये आढळून आला. सदरची महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या होत्या. मात्र, एक महिन्यानंतर त्यांना थंडी, तापाबरोबर पाठदुखी सुरू झाली. तपासणी केल्यानंतर त्यांना उजव्या किडनीमध्ये ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे सामोरे आले. त्यानंतर डॉ. काशिद यांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल झाल्या.

सदर महिलेला कोरोनामुळे फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होते, तर उजवी किडनी ब्लॅक फंगसने निकामी झाली होती. तसेच, त्यांना मधुमेह असल्याने ही शस्त्रक्रिया करणे गुंतागुंतीची होती. मॅक केअर हॉस्पिटलचे किडनी विकारतज्ञ डॉ. आनंद काशिद, मधुमेहतज्ञ डॉ. अभिजित शिंदे, फुफ्फुस विकारतज्ञ डॉ. नीलेश परजने, भूलतज्ञ डॉ. पंकज वंजाळे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील नेमाणे यांनी सदर रुग्णावर उपचार सुरू केले. डॉ. काशिद यांनी गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाची उजवी किडनी काढली. किडनीमध्ये काळ्या रंगाचा पू होता. सहा दिवसांनंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शस्त्रक्रिया मोठी खर्चिक असल्याने रुग्णांचे नातेवाईक तो खर्च पेलण्यास असमर्थ होते. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने शस्त्रक्रिया निःशुल्क करीत फक्त औषधांचा खर्च घेतला, तर रुग्णाचे प्राण वाचविण्यास देवदूत ठरलेल्या डॉ. काशिद यांचा नातेवाईकांनी सत्कार केला.