
लोणावळ्यातील बालरोगतज्ज्ञांच्या बंगल्यावर 10 ते 12 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून गळ्याला धारदार शस्त्र लावून 50 लाखांची रोकड आणि 17 लाखांचे दागिने असा 67 लाखांचा ऐवज लुटला. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री एक ते अडीचच्या सुमारास घडला. या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल हे पत्नी विजया यांच्यासह राहतात. डॉ. खंडेलवाल हे बालरोगतज्ज्ञ आहेत. बंगल्यालगतच त्यांचे क्लिनिक आहे. त्यांना दोन मुले असून, इंजिनीअर मुलगा अमेरिकेत, तर डॉक्टर मुलगा गुजरात-सुरत येथे असतो. गुरुवारी मध्यरात्री एक ते अडीचच्या दरम्यान 10 ते 12 दरोडेखोर डॉ. खंडेलवाल यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीची काच उघडून आत घुसले. त्यानंतर 6 ते 7 जणांनी डॉ.खंडेलवाल यांचे व त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून त्यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावले. डॉक्टरांनी जीवाच्या भीतीने कपाट व लॉकरची चावी दरोडेखोरांच्या स्वाधीन केली. त्यानंतर दरोडेखोरांनी सर्व कपाटे व लॉकर उघडून त्यामधील सुमारे 50 लाखांची रोकड व 17 लाखांचे दागिने असा 67 लाखांचा ऐवज काढून घेतला. दरोडेखोरांनी शयनगृहामधील चादर पहिल्या मजल्यावरील लोखंडी रेलिंगला बांधून भरलेल्या बॅगा घेऊन खाली उतरून पोबारा केला. हा प्रकार बंगल्यातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरोडेखोर निघून गेल्यानंतर डॉक्टरांनी अलार्मचे बटण दाबून दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना इशारा दिला. अलार्मचा आवाज ऐकून कर्मचारी तुषार शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता, त्यांना डॉक्टर व त्यांच्या पत्नीला बांधले असल्याचे निदर्शनास आले. तसेच, घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय सोडविले. तुषार शिंदे यांनी तत्काळ लोणावळा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणावळा पोलीस तपास करीत आहेत.



























































