
संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात. सीसीटीव्ही कॅमेऱयांमधून हे निरीक्षण अधिक प्रभावीपणे करणारे तंत्रज्ञान पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याला ‘सुरक्षाव्यूह’ असे नाव देण्यात आले आहे. लष्करी वापरासाठी तसेच कोरोनाबाधितांचे संपर्क शोधण्यात आणि सोशल डिस्टन्सिंगवर नजर ठेवण्यासाठीही हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते.
एखादी घटना घडून गेली की तिच्या चौकशीसाठी सीसीटीव्ही फुटेज जमा केले जातात. घटना कधी व कशी घडली याचा शोध घेण्यासाठी बरेचसे फुटेज पहावे लागतात. त्यासाठी बराच वेळ आणि परिश्रम खर्च होतात. ‘सुरक्षाव्यूह’च्या सहाय्याने एखादी घटना घडत असतानाच सुरक्षा व्यवस्थेला अॅलर्ट करता येऊ शकते.
पुणे येथील श्रीव्हिसीएआय टेक्नॉलॉजिस या स्टार्ट-अप कंपनीच्या सहकार्याने आयआयटी मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलेन्स इन टेक्नॉलॉजीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून हे तंत्रज्ञान विकसित केले. नौदलाच्या विशाखापट्टणम आणि अन्य डॉकयार्डमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे.
कॉम्युटर सायन्स इंजिनियरींग विभागातील प्रा. गणेश रामकृष्णन यांनी ‘सुरक्षाव्यूह’च्या वैशिष्टय़ांबद्दल माहिती दिली. अनोळखी व्यक्तीला अचूक व वेळीच ओळखणे, संबंधित व्यक्ती किती परिघात हालचाल करतेय आणि कुठे-कुठे मुक्काम करत आहे याप्रमाणेच एखाद्या वस्तूचा शोध घेणे, चेहरा ओळखणे आदी कामे ‘सुरक्षाव्यूह’च्या माध्यमातून केली जाऊ शकतात.
‘सुरक्षाव्यूह’च्या सहाय्याने कोरोना रुग्णाच्या संपका&त आलेल्या व्यक्तींचा शोध घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतेय की नाही यावरही लक्ष ठेवता येऊ शकते. एखाद्या ठिकाणी गर्दी होत असेल तर त्याचीही वेळीच माहिती याद्वारे मिळू शकते.




























































