महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले, महाबळेश्वरात दिवसभरात 1054 पर्यटकांनी दिली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले. यानंतर कोणत्याहीक्षणी पॉइंट्सदेखील पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश येण्याची शक्यता गृहीत धरून दोन दिवसांत सर्व पॉइंट्सची स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात 1054 पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटला.

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली आल्याने जिल्ह्यात लागू केलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे साडेतीन महिन्यांनंतर महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले झाले. पहिल्याच दिवशी रविवारी 1054 पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. पावसाळ्यात येणारे पर्यटक हे पॉइंट पाहण्यासाठी नव्हे, तर पावसात मनसोक्त भिजण्यासाठी तसेच डोंगरावरून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी येतात. आता उद्यापासून अशा हौशी पर्यकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल, हे आज आलेल्या पर्यटकांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात महाबळेश्वरमधील अनेक पॉइंट बंदच राहतात. परंतु, शहराजवळ आणि पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले काही पॉइंट हे वन विभागाच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे येथील प्रसिद्ध वेण्णालेक हा पालिकेच्या ताब्यात आहे. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या पॉइंट्सपैकी केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट, लॉडविक पॉइंट, मुंबई पॉइंट आणि प्रसिद्ध लिंगमळा धबधबा हे पॉइंट पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सर्व पावसाळी पॉइंट्सच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आज वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व सचिव आणि महासमितीचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व पॉइंट्सची स्वच्छता करून पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचा आढावा दोन दिवसांत घेण्यात येणार आहे.

या बैठकीला संयुक्त वन व्यवस्थापन महासमितीचे अध्यक्ष विजय भिलारे, सचिव एल. डी. राऊत, तानाजी केळगणे, संजय कमलेकर, अनिल केळगणे, रमेश चोरमले, पंढरीनाथ लांगी, विलास मोरे, नाना वाडेकर, संजय केळगणे, धनंजय केळगणे, संदिप भिलारे आदी उपस्थित होते.

पर्यटकांची होणार ऍण्टीजेन टेस्ट

महाबळेश्वरला येणाऱया पर्यटकांची पाचगणी येथील दांडेघर नाक्यावर रॅपिड ऍण्टीजेन टेस्ट घेण्यात येणार असली तरी नाक्यावर आलेल्या पर्यटकांची ऑक्सिजन लेवल व टेम्परेचर तपासण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात हुल्लडबाज पर्यटकही येतात. त्यांचा इतर पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी सुरक्षागार्ड नेमण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व पॉइंट्स वेळेत बंद करण्यात येणार असून, वेळेआधी एक तास आधी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

आजपासून बाजारपेठ खुली

महाबळेश्वरची बाजारपेठ ही उद्यापासून (दि. 21) सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासोबत  पर्यटकांना महाबळेश्वरच्या खास बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.