अनिल देशमुख यांच्या घरांवर ‘ईडी’चा छापा; मुंबई, नागपूरमध्ये पाच ठिकाणी झडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने धडक कारवाई सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबई, नागपूरमधील देशमुख यांच्या निवास्थानासह तब्बल पाच ठिकाणी छापेमारी करत काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले. तसेच देशमुख यांचा व्यावसायिक भागीदार असलेल्या नागपूरमधील एकाच्या घरीदेखील छापा टाकला. ईडीची सायबर फॉरेन्सिक टीमचीही  यावेळी उपस्थिती होती.

मुंबईहून गुरूवारी रात्री नागपूर येथे दाखल झालेल्या ईडीच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. नागपूरमध्ये कारवाई सुरू असतानाच ईडीच्या दुसऱया पथकाने मुंबईत वरळी येथील सुखदा इमारत तसेच ज्ञानेश्वरी या सरकारी बंगल्यावरही छापा टाकला. या कारवाई दरम्यान सीआरपीएफ जवानांसह पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यापूर्वी 16 जूनला ईडीच्या तीन पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱयाच्या घरीही छापे टाकले होते. त्यानंतर अवघ्या नऊ दिवसातच ईडीने देशमुख यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

खाजगी सचिव पालांडे आणि शिंदे यांची चौकशी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली.

अॅन्टालीया प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणात परमबीर यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आरोप करायचेच होती तर पदावर असताना करायला हवे होते. अॅन्टालीया प्रकरण व मनसुख हिरेन  प्रकरणात अटक झालेले सचिन वाझे, रियाझ काझी, सुनील माने, विनायक शिंदे हे पोलीस अधिकारी परमबीर यांनाच थेट रिपोर्टींग करत होते. एनआय या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सत्य काय ते सर्वांसमोर येईल असे अनिल देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले आहे.

अनिल देशमुखांवर झालेल्या कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात आंदोलन केले. यावेळी भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,  ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या कथित आरोपप्रकरणी ईडी, सीबीआय या पेंद्रीय तपास यंत्रणांकडून जी चौकशी सुरू आहे. त्यांना आपल्याकडून तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.