रात्रशाळांसाठी भरमसाठ भाडेवाढ, भाडे माफ करण्याची शिक्षक भारतीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रात्रशाळांसाठी भरमसाठ भाडेवाढ करण्यात आली असून हे भाडे माफ करण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत रात्रशाळा, रात्र ज्युनियर कॉलेज सुरू आहेत. या रात्रशाळांना वाढीव शुल्क आकारून भाडे पावत्या देण्यात आल्या आहेत. मुंबईतील रात्रशाळांना 150 वर्षांची परंपरा आहे. या रात्रशाळांमध्ये गरीब, मागासवर्गीय, कष्टकरी समाज घटकातील मुले शिक्षण घेतात. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रात्रशाळांचे भाडे माफ करून नाममात्र भाडे 50 रुपये ठरवण्यात आले होते, अशी माहिती भारती हिंदी नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक माताचरण मिश्रा यांनी दिली.

मात्र आता 2015-16, 2017-18 आणि 2018-19 या वर्षासाठी प्रत्येक वर्गामागे 870, 910 रुपये याप्रमाणे भाडेवाढ करून लाखो रुपये भरण्याबाबत नोटिसा पाठवण्यात येत आहेत. या रात्रशाळा गरीब संस्थांकडून सेवाभावी पद्धतीने चालवल्या जातात. त्यामुळे हे भाडे भरणे त्यांना शक्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी सांगितले आहे.