
>> डॉ. संजय गायकवाड
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुलांना अधिक फटका बसेल या चर्चेला शास्त्र्ााrय आधार नाही. पालकांनी प्रमाणापेक्षा जास्त धसका घेणे योग्य ठरणार नाही. घबराटीचे वातावरण, मुलांवर दबाव आणणे या गोष्टी टाळून मुलांना सहकार्य करावे. त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. महामारीविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सरकार आणि पालकांनी शास्त्र्ाज्ञांच्या सल्ल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अफवा पसरविणाऱया आणि घबराट निर्माण करणाऱयांकडे लक्ष देता कामा नये.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रकोप आता कमी होत चालल्याचे दिसत आहे, परंतु त्याचबरोबर तिसरी लाट येण्याबाबत अंदाजही बांधले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ञांमध्ये एकमत होताना दिसत नाही. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरेल, असे सांगितले जात असले तरी त्याला काही शास्त्र्ााrय आधार नाही. कोणताही पुरावा नसताना काही लोकांनी तिसऱया लाटेचा मुलांवर अधिक घातक परिणाम होणार असल्याची अफवा पसरविली आहे. सिंगापूरमध्ये शाळा बंद झाल्याचा परिणामही आपल्याकडील लोकांच्या विचारांवर झाला. शाळा-महाविद्यालये तर हिंदुस्थानातही बंदच आहेत. तिसऱया किंवा त्यापुढील कोणत्याही लाटेचा मुलांवर अधिक दुष्परिणाम होईल याबाबत जगाच्या कोणत्याही कोपऱयातून कोणताही पुरावा पुढे आलेला नाही. तरीही पालक खूपच तणावाखाली आहेत. त्यांचा तणाव स्वाभाविकच आहे, कारण हिंदुस्थानात मुलांसाठी अद्याप कोणतीही लस आलेली नाही. कोरोनाच्या दुसऱया लाटेत मुले बाधित झाली आहेत. राज्यात नगर जिह्यात 8 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली होती; परंतु ती मुले दोन-तीन दिवसांत बरी झाली होती. मुलांना संसर्ग होण्याच्या प्रमाणात 3.3 टक्के वृद्धी झाली आहे असाही दावा करण्यात आला.
कोरोनाच्या प्रभावापासून लहान मुलांचाच वयोगट आतापर्यंत मुक्त राहिला आहे. त्यामुळे कदाचित महामारीचा पुढील फटका या वयोगटाला बसू शकतो या विचारांतूनच मुलांना तिसऱया लाटेचा अधिक धोका असल्याचा भ्रम पसरला असावा. इंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने म्हटले आहे की, तिसऱया लाटेमुळे प्रामुख्याने लहान मुलांवर अधिक परिणाम होईल ही भीती खरी ठरण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर मोठय़ा संख्येने लोक कोरोना संसर्गग्रस्त झाले, तर त्यात मुलांचा समावेश असू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यांत राज्यात सुमारे 29 लाख कोरोना रुग्ण आढळून आले. त्यात मुलांची संख्या 99 हजार होती. म्हणजेच मुले संसर्गग्रस्त होण्याचे प्रमाण 3.5 टक्के होते. दुसऱया लाटेचा प्रकोप पहिल्या लाटेच्या चारपट अधिक होता. अशा स्थितीत मुले संसर्गग्रस्त होण्याच्या प्रमाणात झालेली 3.3 टक्क्यांची वाढ इतर वयोगटांच्या तुलनेत कमीच आहे. ज्या कोरोना संसर्गग्रस्त मुलांना रुग्णालयांत दाखल करण्याची गरज भासली, त्यापैकी बहुतांश मुलांना पहिल्यापासूनच एखादा आजार होता. पालक मानसिक दबावाखाली आले. त्यामुळे राज्य सरकारने मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आणि स्वतंत्र टास्क फोर्सचीही स्थापना केली. काही रुग्णालयांमध्ये मुलांसाठी असे कक्ष तयार करण्यात येत आहेत, ज्यातील भिंतींवर मुलांची आवडती कार्टून रेखाटण्यात येत आहेत. मुले हेच देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच कोरोनाच्या तिसऱया लाटेची शंका वर्तविण्यात येत असताना आपल्याला अशी तयारी करायला हवी, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला आपल्याला करता येईल.
चीनमध्ये तीन वर्षे वयावरील मुलांना लस देण्यास अनुमती दिली आहे. ब्रिटनमध्ये 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलामुलींना फायझरची लस देण्याची अनुमती देण्यात आली आहे. अमेरिकेनेही किशोरवयीन मुलांना लस देण्यास सुरुवात केली आहे. कॅनडामध्येही चाचणीनंतर 12 ते 15 वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. हिंदुस्थानातही मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मुलांवर हिंदुस्थानात तयार झालेल्या बायोटेकच्या लसीची चाचणी आधीच सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी घेतली जाईल, नंतर 6 ते 12 वयोगटातील मुलांवर चाचणी केली जाईल. या चाचण्यांसाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल. चाचणीत वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला जाईल. उदाहरणार्थ, मुलांसाठी लस किती सुरक्षित आहे आणि तिचे दुष्परिणाम आहेत का? याचा अभ्यास केला जाईल.
12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी हिंदुस्थानला लसीच्या 26 कोटी मात्रा लागतील. या वयोगटातील मुलांची संख्या 13 ते 14 कोटी आहे. हा काही छोटा समूह नाही. अनेक राज्यांमध्ये टाळेबंदी उठविण्यात आली आहे, परंतु दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा सुरू करण्यासंबंधी अद्याप विचारविनिमय झालेला नाही. मुलांचे लसीकरण केल्यावरच हे शक्य होणार आहे. श्रीमंत देशांमध्ये मुलांसाठीही लसी अधिकृत करण्यात येत आहेत, परंतु जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) त्याला प्राधान्य देत नाही. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे मुलांना गंभीर आजार होण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तिसरी लाट कधी येईल याची निश्चित भविष्यवाणी कुणीच करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर आपल्याला समोर येईल त्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार राहायलाच हवे. पालकांनीही तिसऱया लाटेचा प्रमाणापेक्षा जास्त धसका घेणे योग्य ठरणार नाही. घबराटीचे वातावरण, मुलांवर दबाव आणणे या गोष्टी टाळून मुलांना सहकार्य करावे. त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. महामारीविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सरकार आणि पालकांनी शास्त्र्ाज्ञांच्या सल्ल्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अफवा पसरविणाऱया आणि घबराट निर्माण करणाऱयांकडे लक्ष देता कामा नये. जोपर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पालकांनी मनोबल कायम राखायला हवे.
देशाच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी 70 ते 85 टक्के लोकांना लस दिल्याखेरीज कोरोनाशी लढणे अशक्य आहे ही गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्येला लस दिली जात नाही तोपर्यंत कोरोनाच्या एकापाठोपाठ एक लाटा येत राहतील आणि त्यामुळेच लसीकरणापासून लहान मुलांना दूर ठेवता येणार नाही. हिंदुस्थानात 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची लोकसंख्या 30 टक्के आहे. जर या लोकसंख्येचे लसीकरण लवकरात लवकर झाले नाही तर कोरोनावर नियंत्रण मिळविणे अवघड जाईल. मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे हे खरे आहे आणि झालेच तरी मुले लक्षणविरहित (एसिम्प्टोमॅटिक) राहतात. मुले घरात कैद आहेत आणि ती बेचैन तसेच उदास आहेत. मुले आधीच मानसिक तणावाखालून जात आहेत. त्यांना मानसिकदृष्टय़ा सुदृढ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.




























































