सोलापूर रेल्वे स्टेशनवर आणखी दोन स्टेबलिंग लाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 700 मीटरच्या दोन स्टेबलिंग लाइन अर्थात मार्गिका मंजूर झाल्या असून, या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. लाइनमुळे आऊटरवर थांबणाऱया गाडय़ा आणि प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. यासाठी वाडी एंड येथे नव्या लाइनचे काम केले जाणार आहे.

नव्या दोन मार्गामुळे फलाट क्रमांक 4 आणि 5वर ठेवल्या जाणाऱया गाडय़ांना या नव्या मार्गिकेवर ठेवले जाईल. त्यामुळे फलाट क्रमांक 4 आणि 5 प्रवासी गाडय़ांना उपलब्ध होतील. त्यामुळे आऊटरवर थांबणाऱया गाडय़ांना थांबण्याची गरज भासणार नाही. या दोन नव्या मार्गिका टाकण्यासाठी जवळपास सात कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी येत्या महिनाभरात या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. फलाट क्रमांक 4 आणि 5 हे गाडय़ा व्यस्त होते. मात्र, आता या दोन नव्या लाइनमुळे येथे उभ्या करण्यात येणाऱया गाडय़ा स्टेबलिंग लाइनवर उभ्या करता येणार आहेत. त्यामुळे आऊटरवर थांबणाऱया गाडय़ांना फलाट उपलब्ध होणार आहे.

आऊटरवर थांबणाऱया गाडय़ांची लवकर सुटका

फलाट उपलब्ध होत नसल्याने स्थानकांवर येणाऱया गाडय़ांना आऊटरवर थांबावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांची यातून लवकरच सुटका होणार आहे. दोन नव्या लाइनची 40 डबे ठेवण्याची क्षमता असणार आहे. स्थानकांवर ठेवल्या जाणाऱया गाडय़ा आता स्टेबलिंग लाइनवर ठेवण्याची सोय होणार आहे.

सोलापूर विभागात दोन नव्या स्टेबलिंग लाइन मंजूर झालेल्या आहेत. यामुळे यार्डात थांबणाऱया गांडय़ांना येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरील सर्व प्लॅटफार्म वापरता येणार आहेत. स्टेबलिंग लाइनच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
– शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक.