
सिरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीला अखेर युरोपातील नऊ देशांमध्ये ‘ग्रीन पास’ मिळाला आहे. जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलॅण्ड, आयर्लंड, स्पेन, स्वित्झर्लंड आणि एस्टोनिया या देशांनी कोविशिल्डला मान्यता दिली आहे. हिंदुस्थानने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर हे देश ताळय़ावर आले आहेत. येथे अजून कोव्हॅक्सिनसाठी ’ग्रीन पास’च्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
युरोपियन संघाची ‘ग्रीन पास’ ही डिजिटल कोव्हिड सर्टिफिकेट योजना गुरुवारपासून लागू झाली आहे. गुरुवारी जर्मनी, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलॅण्ड, आयर्लंड, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांनी कोविशिल्डला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता कोविशिल्डचे दोन डोस घेतलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना या देशांमध्ये प्रवास करता येईल. एस्टोनियाने हिंदुस्थानमध्ये मान्यता असलेल्या सर्व लसींचे डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाला परवानगी दिली आहे.




























































