शहरात गहाळ झालेले 34 मोबाईल समर्थ पोलिसांनी मिळवून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामानिमित्त प्रवास करताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल 34 महागडे मोबाईल पुणे शहरातील समर्थ पोलिसांनी पाठपुरावा करून नागरिकांना शोधून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. यासंदर्भात पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड’ वेबपोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली होती.

नागरिकांनी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने संबंधित मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. यावेळी गहाळ झालेल्या 60 मोबाईलपैकी 34 मोबाईल विविध भागांत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल वापरकर्त्यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर संबंधितांकडून मोबाईल जमा करण्यात आले होते.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सुभाष मोरे आणि सुभाष पिंगळे यांनी मोबाईल प्राप्त झाल्यानंतर तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचे मोबाईल परत दिले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुशील लोणकर, संतोष काळे, सुमित खुट्टे, नीलेश साबळे, श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने केली.