
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबरोबरच केंद्रीय कृषी कायदा या महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून हे अधिवेशन गाजणार आहे. शेतकऱयांवर अन्यायकारक ठरणाऱया या कृषी कायद्यांविरोधात राज्य सरकार ठराव मांडणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेल्या ओबीसींच्या निवडणुकीतील आरक्षणासाठी एम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणारा ठराव या अधिवेशनात केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित दोन दिवसांचा कालावधी आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे लागू केल्यानंतर आता राज्य सरकारला त्यावर भूमिका घ्यावी लागणार आहे. राज्यात कृषी कायद्यांचे सुधारणा विधेयक आणायचे असेल तर आधी सर्वांचे विशेषतः शेतकऱयांचे मत विचारात घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. दिल्लीत ज्या कायद्यांविरोधात शेतकऱयांनी आंदोलन पुकारले आहे त्याच कृषी कायद्यांत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून यासंदर्भातील ठराव या अधिवेशनात केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एम्पेरिकल डेटाबाबतही राज्य सरकारची आग्रही भूमिका असून त्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत आवश्यक भूमिका केंद्राकडून घेऊन 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द केली जावी यासाठी एकमताने मागणी करणार ठराव याच अधिवेशनात मंजूर करण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात मांडली जाणारी विधेयके व अध्यादेश
- संस्थांच्या वार्षिक सर्वसधारण सभा होत नसल्याने सभासद अक्रियाशील होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सहकारी विधेयक 2021
- इनाम आणि वतन जमिनींवरील गुंठेवारी नियमाधीन करताना, इनाम व वतने रद्द करण्याबाबतच्या अधिनियमांन्वये अनर्जित उत्पन्नाची व रोख वसूल केल्या जाणार्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी आहे. यासंदर्भातील महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करण्यासाठी विधेयक मांडणार.
- महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाची मुदत दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात आल्याने प्रशासकाला मुदतवाढ देणे व त्याने घेतलेल्या निर्णयांना कायदेशीर संरक्षण देणरे विधेयक.
- राज्यातील प्राचीन वृक्षांच्या संवर्धनासाठीचे विधेयक
- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक, 2021
चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. विधान भवनात प्रवेशासाठी प्रत्येकाची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. शनिवार व रविवार दोन दिवस चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी सुमारे दोन हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक लिपिक, दोन शिपाई व एक फायरमनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल उद्या सोमवारी येतील.
शेतकरी संसदेला घेराव घालणार
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले गेल्या 7 महिन्यांपासूनचे आंदोलन आता अधिक तीव्र होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शेतकरी आता संसदेवर धडकणार आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया संयुक्त किसान मोर्चाने आज याची घोषणा केली. संसदेचे अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार असून 22 जुलैपासून 200 शेतकरी संसदेसमोर आंदोलन करणार आहेत. विरोधी पक्षात असलेल्या खासदारांनी संसदेत आमचा आवाज बुलंद करावा नाही तर राजीनामा द्यावा, असेही शेतकऱयांनी सुनावले आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीविरोधातही 8 जुलैपासून देशभरात आंदोलन करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या नावाखाली सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकऱयांचे प्रश्न, लॉकडाउन असे अनेक प्रश्न आहेत. पण विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची बैठक दादर येथील भाजप कार्यालयात झाली त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली महाविकास आघाडी सरकारची आजपर्यंत 7 अधिवेशन झाली, त्याचे दिवस 36 दिवस असून कोविड काळात 14 दिवस अधिवेशन झाले. याच काळात संसदेचे 69 दिवस अधिवेशन झाले. कोविडच्या नावावर आघाडी सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले असा आरोप केला
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकऩयांचे प्रश्न, करोनाचे प्रश्न, लॉकडाउन असे अनेक प्रश्न आहेत. पण या विषयांवर बोलण्यासाठी कोणतेही आयुध आमच्यासाठी शिल्लक ठेवलेले नाही.
म्हणून आम्ही ठरवले की आम्हाला सभागृहात जे मांडता येईल, ते मांडण्याचा प्रयत्न करू. जेमांडता येणार नाही ते बाहेर माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर येऊन मांडू. अशा प्रकारे लोकशाचीही थट्टा तात्काळ बंद केली पाहिजे. राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढला आहे. हे सरकार अधिवेशनाचा सामना करू शकत नाही. अशीही टीका केली
सरकारकडे बहुमत आहे, मग विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला. एमपीएससी परिक्षार्थी विद्यार्थ्यांची आत्महत्या गंभीर घटना आहे. एमपीएससीवर सदस्य नाहीत, परिक्षा वेळेत होत नाहीत, असा आरोप करत आयोगाची पुनर्रचना केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली तर ओबीसी आरक्षण वाचले असते
राज्य सरकार इतके दिवस पेंद्राकडे ओबीसींचा इम्पिरीकल डेटा मागत होते. मग आता राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम का दिले? हा निर्णय पूर्वी घेतला असता तर ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचले असते असा दावा त्यांनी केला
शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही
शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्यांचा हात धरून ते गेले, असे ते म्हणताच शिवसेना हात सोडून आली तर पुन्हा युती होणार का? असे पत्रकारांनी विचारले. यावर जर तरच्या गोष्टी राजकारणात होत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

































































