मुंबईकरांनो, तब्येत सांभाळा; पावसाळी आजारांनी डोके वर काढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना आता पूर्ण नियंत्रणात येत असला तरी पावसाळी आजारांनी डोके वर काढले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबईत जूनअखेर मलेरियाचे 279, गॅस्ट्रो 149 तर डेंग्यूच्या 13 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सुदैवाने एकाचाही मृत्यू झाला नसला तरी मुंबईकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यावर आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले होते. मात्र राज्य सरकारने घातलेले निर्बंध आणि पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आला आहे. दुसऱया लाटेत दहा हजारांपार गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता 500 पर्यंत खाली आहे. मात्र पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने पावसाळी आजार रोखण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. मेच्या अखेरपासूनच केईएम, नायर, शीव आणि कूपर या मुख्य रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये दीड हजार बेड तैनात ठेवून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बेडच्या नियोजनानुसार डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱयांना प्रशिक्षण देऊन व्यवस्था उभारण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी जूनमध्ये मलेरियाचे 328, तर 2019 मध्ये 313 रुग्ण आढळले होते. तर यावर्षी 279 रुग्ण आढळले आहेत.

2019 मध्ये लेप्टोचे 5, तर 2020 मध्ये केवळ एक रुग्ण आढळला होता. मात्र यावर्षी लेप्टोचे 13 रुग्ण आढळले आहेत.

2019 मध्ये डेंग्यूचे 8 तर 2021 मध्ये केवळ 4 रुग्ण आढळले होते.

तर यावर्षी जूनमध्ये डेंग्यूचे 10 रुग्ण आढळले आहेत.

गॅस्ट्रोचे जूनमध्ये गेल्या वर्षी 40 रुग्ण आढळले होते, तर यावर्षी 149 रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी एच1एन1चा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र यावर्षी 6 रुग्ण आढळले आहेत.

हिपॅटायटीसच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून गेल्या वर्षी 3 रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी 15 रुग्ण आढळले आहेत.

पालिकेची यंत्रणा सज्ज!

पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर पालिकेकडून संबंधित परिसरातील डासांची उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात येत आहेत. गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्यास त्या परिसरात दूषित पाणी येत आहे का याचा आढावा घेतला जातो. तसेच पालिकेकडून प्रभागात नियमितपणे पाण्याची तपासणी केली जाते. लेप्टो प्रामुख्याने प्राण्यांच्या मलमुत्रातून पसरत असल्याने त्याबाबतही पावसाळ्यापूर्वी खबरदारी, जनजागृती केली जात आहे.