
सभागृहात शिवीगाळ व गैरवर्तन करणाऱया भाजपच्या बारा आमदारांना निलंबित केल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धमक्या देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांनी भास्कर जाधव यांना ट्विटरच्या माध्यमातून धमक्या येत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. त्यावर सुनील प्रभू यांनीही चिंता व्यक्त केली. भास्कर जाधव यांना धमक्या येत आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देण्याची गरज सुनील प्रभू यांनी व्यक्त केली. रवींद्र वायकर यांनीही चिंता व्यक्त केली. तालिका अध्यक्षांना धमक्या येण्याचे प्रकार गंभीर असल्याचे ते म्हणाले.
या चर्चेत स्वतŠ भास्कर जाधव यांनी भाग घेतला. ते म्हणाले की, केंद्रात आमचे सरकार आहे. याला आत टाकू, त्याला आत टाकू अशा धमक्या दिल्या जात आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी तर खुलेआम धमकी दिली, अरे पण धमक्या कोणाला देता? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. मी यापूर्वीही कधी पोलीस संरक्षण घेतले नाही आणि आताही मला संरक्षण नको. कारण मी काही चुकीचे काम केलेले नाही, कोणावर अन्याय केलेला नाही. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पोलीस संरक्षण घेण्याची भास्कर जाधव यांची इच्छा असो किंवा नसो, पण ही जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.


























































