धाडसी दाम्पत्यामुळे शस्त्रधारी चेनस्नॅचर पकडला, जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा केला प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यायाम करून (मार्निंग वॉक) घरी चाललेल्या जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 65 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून साथीदारासोबत दुचाकीवर पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्याला दाम्पत्याने धाडसाने पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याच्या हातातील शस्त्राला न घाबरता दाम्पत्याने त्याला खाली पाडले. त्यांच्या धाडसामुळे पोलिसांकडून कौतुक केले जात आहे. कुणाल राजू खरात (वय – 25, रा. लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रसाद आणि प्राची तिखे (रा. शुक्रवार पेठ) असे धाडसी दाम्पत्याचे नाव आहे.

तिखे कुटुंबिय मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास व्यायाम करून बाजीराव रस्त्यावरील पुरम चौकातून घरी चालले होते. बाजीराव रस्त्यावरील एका कार डेपो समोरून प्रसाद, प्रीती तिखे (दाम्पत्य) त्यांच्या आई मंगला तिखे (वय – 79) जात असताना अचानकपणे दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी मंगला यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारला. त्यावेळी त्यांनी जोरात ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला. त्यामुळे काही अंतरावर चालत असलेले प्रसाद आणि प्रीती यांनी मागे वळून पाहिले असता, चोरटा मंगळसूत्र चोरून पळत होता.

तिखे दाम्पत्याने आरोपी कुणालचा पाठलाग करून मंगळसूत्र ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने त्याच्याकडील शस्त्राचा धाक दाखवून तिखे कुटुंबियांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्याने मोठ्या हिमतीने प्रतिकार करून आरोपी कुणालच्या हातातील खुरेप्यासारखे शस्त्र काढून घेतले. त्यावेळी दुसरा चोरटा मुकेश कांबळे रा. लक्ष्मीनगर हा पसार झाला. दरम्यान, तिखे कुटुंबियांनी आरोपी कुणालला पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

मॉर्निग वॉकसाठीही दागदागिन्यांची हाव

शहरातील विविध भागात नागरिकांकडून व्यायाम करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. मात्र, व्यायामाला जात असताना अनेकांकडून दागदागिने घातले जात आहेत. विशेषतः महिलांकडून दागिने परिधान केल्यामुळे चोरट्यांना सावज टिपण्यास जास्त वेळ लागत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे व्यायामाला जाताना दागदागिने टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मंगळसूत्र हिसकावून पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला दाम्पत्याने पकडून खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. नागरिकांनी व्यायामाला जाताना दागदागिने घालण्याचे टाळावे.

श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे