
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिका राबवत असलेल्या मुंबई मॉडेलचे कौतुक आता अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने केले आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्’चे सदस्य जे. लुईस कोरिया यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई महापालिकेने ट्रेसिंग,ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चतुर्सूत्री प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह वाढत्या रुग्णसंख्येसाठी युद्धपातळीवर जम्बो कोरोना रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती तर पालिका, राज्य व खासगी रुग्णालयांत केंद्रीय बेड नियोजन, रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि या सर्वांवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी वॉररूम आणि डॅशबोर्डच्या सुविधा उभारल्या. कोरोना नियंत्रणाच्या या मुंबई मॉडेलचे कौतुक आता अमेरिकेने केले आहे.
वॉररूमची लई भारी’ कामगिरी
कोरोनाला रोखण्यासाठी राबवत असलेल्या मुंबई मॉडेलचे व्यवस्थापन कौतुकास्पद असून विभाग स्तरांवर निर्माण केलेल्या वॉररूमचे विशेष कौतुक केले आहे. वॉररूम सुरू करून गरजू रुग्णांना बेडचे वितरण संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार व संसर्गाच्या प्रभावानुसार रुग्णालयात दाखल करून उपचार करणे, गरजू रुग्णांना योग्य प्रमाणात प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे याचा कोरिया यांनी पत्रात आवर्जून उल्लेख केला.
संसर्गाचे प्रमाण 30 वरून 4 टक्क्यांवर
मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या मुंबई मॉडेलमुळे एप्रिल महिन्यात जवळजवळ 30 टक्के इतके असणारे कोरोना संसर्गाचे प्रमाण आता 4 टक्क्यांवर आले आहे ही बाब नमूद करत कोरिया यांनी मुंबईत राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम हे व्यवस्थापन कौशल्याचे अत्युकृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे. चहल यांचे कार्य त्यांच्या सहकाऱयांसाठीही अनुकरणीय असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.































































