
टोकियो ऑलिम्पिकचा थरार 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. दोनच आठवडय़ांपूर्वी स्पर्धा आयोजकांनी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानावर एण्ट्री देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांविना ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी जपानमध्ये आणीबाणी लागू केली आहे. ही आणीबाणी सोमवारपासून ते 22 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्येदेखील प्रेक्षकांना ‘नो एण्ट्री’ करण्यात येणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांकडून गेल्या महिन्यात स्पष्ट करण्यात आले होते की, ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये 10 हजार क्रीडाप्रेमींना परवानगी देण्यात येईल. मात्र कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर यावर बंदी आणण्यात येईल. टोकियोमधील नागरिकांना मैदानात जाऊन ऑलिम्पिक खेळ पाहणे शक्य आहे का, हे तपासले जात होते. पण आणीबाणीमुळे स्थानिक प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यताही आता दिसत नाहीये. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेऊन टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सोमवारपासून 22 ऑगस्टपर्यंत ही आणीबाणी लागू असेल.























































