
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंगळवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुक जवळ येत असून सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय होत आहेत. अनेक राष्ट्रीय पक्षांचे नेते गोव्यात येत लागले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा सोमवारपासून 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार होते. मात्र, दिल्ली येथे महत्वाची बैठक असल्याने रविवारी त्यांनी आपला गोवा दौरा रद्द केल्याचे कळवले होते. सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत मंगळवारी गोव्यात येत असल्याचे सांगितल्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण तापले आहे. केजरीवाल मंगळवारी गोव्यात येणार असून निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते अनेक बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
Goa wants change.
Enough of parties buying and selling MLAs. Enough of dirty politics. Goa wants development. There is no shortage of funds, only shortage of honest intent. Goa wants honest politics.
See you in Goa tomorrow.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) July 12, 2021
केजरीवाल यांनी ट्विट करत गोव्यात येण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आहे. गोव्याला नवा बदल हवा आहे. आमदारांची खरेदी-विक्री करणरे घाणरडे राजकारण खूप झाले. गोव्याला विकास हवा आहे; उद्या गोव्यात भेटू, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. केजरीवाल म्हणतात, निधीची कमतरता नाही, फक्त प्रामाणिक हेतूची कमतरता आहे आणि गोव्याला प्रामाणिक राजकारण हवे आहे.
‘आम आदमी पक्षा’ने शनिवारी कॉंग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या आणि मतदारांचा विश्वासघात केलेल्या आमदारांच्या कृतीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी त्या 10 आमदारांच्या घरी केक पाठवले होते.या पक्षांतराच्या घटनेला दोन वर्षे झाली असल्याचे औचित्य साधून आपने काँग्रेस आणि भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा आणि आतिशी यांनी याच मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेसला घेरुन राजकरण स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली असून त्याला 70 हजारहुन अधिक लोकांनी समर्थन दिल्यामुळे आपचा जनाधार वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.






























































