
वीज कोसळणे म्हणजे जीवघेणी हे दुर्दैवाने समीकरणच बनले असून गेल्या 24 तासांत देशाच्या उत्तर भागात विजांच्या कडकडाटांनी मृत्यूचे तांडव घातले. उत्तर प्रदेशात 37, राजस्थानात 20 आणि मध्य प्रदेशात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तीन राज्यांत 68 जण ठार झाले. या भयंकर नैसर्गिक आपत्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे सर्वाधिक जीवितहानी झाली. दोन लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये दोन महिलांसह पाचजणांचा मृत्यू झाला. फिरोजाबाद जिह्यात तीनजण, कोसांबी येथे दोघांचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मध्य प्रदेशातही विजांनी मृत्यूचे तांडव घातले आहे. ग्वालियर, शिवपुरी, बैतुल, होशंगाबाद, रिवा येथे वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहे.
भीषण घटना जयपूर येथील प्रसिद्ध अंबर किल्ल्यावर घडली. किल्ल्यावर तरुण-तरुणींचा ग्रुप पावसात भिजण्याचा आनंद घेत होता. विजांचा कडकडाट सुरू झाला. वॉच टॉवरवर तरुण सेल्फी घेत होते. विजांच्या कडकडाटाचा मोबाईलवर फोटो काढत होते. तेवढय़ात वीज कोसळली आणि 11 जण जागीच ठार झाले. आठ जण जखमी होऊन दरीत कोसळले.


























































