
महेंद्र सिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीननंतर आता टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार राहिलेल्या सौरव गांगुली याच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. सौरव गांगुलीने त्याच्यावर चित्रपट तयार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दादाच्या चाहत्यांना त्यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

सौरव गांगुलीने एका वेबसाईटशी बोलताना त्याच्यावरील चित्रपटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘हो मी आत्मचरित्रावरील चित्रपटासाठी होकार दिला आहे. हा चित्रपच हिंदी भाषेत असणार आहे. अद्याप चित्रपटाबाबतच्या इतर काही गोष्टी अंतिम टप्प्यात असून त्यानंतरच त्याबाबत अधिक माहिती देता येईल’, असे गांगुलीने या मुलाखतीत सांगितले.

या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र रणबीर सोबत आणखी दोन अभिनेत्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच या चित्रपटाचे बजेट तब्बल 200 कोटींचे असल्याचे देखील समजते.





























































