तर आमचे मिसाईल आणि सैनिक तयार आहेत, चीनने पाकिस्तानला दिला सज्जड दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्याने चीन चांगलाच भडकला आहे. हा दहशतवादी हल्ला नसून गॅसची गळती झाल्याने हा अपघात झाल्याचा बनाव पाकिस्तानने केला होता. त्यावर चीनने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. तसेच जर तुम्हाला दहशतवाद्यांचा मुकाबला करता येत नसेल तर आमचे सैनिक आणि मिसाईल तयार आहे असा सज्जड दम चीनने पाकिस्तानला दिला आहे.

चीनने दशतवादाच्या मुद्द्यावर नेहमीच पाकिस्तानला पाठीशी घातले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेत मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतावादी घोषित करण्यासाठी हिंदुस्थानकडून प्रयत्न केले जात होते. परंतु चीननेच त्यात आडकाठी केली होती. आता आपल्याच नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाल्याने चीनचा जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतात दासू धरणाचे काम सुरू आहे. चीनचे इंजीनीनर हे धरण बांधत असून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी त्यांच्या एका बसवर हल्ला केला. या हल्ल्यात चीनच्या 9 नागरिकांचा मृत्यू झाला होता. परंतु हा दहशतवादी हल्ला नसून गॅस गळतीमुळे झालेला अपघात आहे अशी सारवासारव पाकिस्तानने केली होती. परंतु चीनने कुठलीही सबब ऐकून न घेता पाकिस्तानला फैलावर घेतले आहे. चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक हु शिजीन यांनी ट्विट करून म्हटले आहे की,“या हल्ल्याला जवाबदार असलेल्या दहशतवाद्यांना अजूनही पकडण्यात आले नाही. तातडीने त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला पाहिजे. जर पाकिस्तानला हे जमत नसेल तर चीनचे सैनिक आणि मिसाईल यासाठी कामाला लावले जातील.”

>

दरम्यान या स्फोटाचा पूर्ण तपास केला जाईल असे आश्वासन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनला दिले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या चीनच्या नागरिकांबद्दल खान यांनी दुःख व्यक्त केले. खान म्हणाले की,शत्रूंची ताकद उभय देशातील सौहार्दपूर्ण संबंधांना नुकसान पोहोचू शकत नाही.  पाकिस्तान आणि चीनची घट्ट मैत्री आहे. पाकिस्तानमधील चीनच्या नागरिकांची सुरक्षितता ही आपल्या सरकारची जवाबदारी आहे असेही खान यांनी नमूद केले आहे.