
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आली असून संपूर्ण मुंबईचा सरासरी रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हजार 34 दिवसांवर गेला आहे. विशेष म्हणजे 24 पैकी 16 वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीने एक हजार दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मुंबईतून कोरोना हद्दपार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रुग्ण दुपटीच्या कालावधीमध्ये बी वॉर्ड सॅण्डहर्स्ट रोड 6336 दिवसांसह सर्वोत्तम स्थानी तर एस वॉर्ड भांडुप 744 दिवसांसह सर्वात खालच्या स्थानी आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी हॉटस्पॉट निर्माण झाले. राज्य सरकारकडून घालण्यात आलेले निर्बंध आणि महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना यामुळे कोरोनाची पहिली लाट जानेवारीअखेर पूर्ण आटोक्यात आली. मात्र निर्बंध उठवल्याने पुन्हा वाढलेली गर्दी, कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे पुन्हा फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे जानेवारीअखेर 334 रुग्णांपर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या थेट दहा हजारांचा आकडा पार करून अकरा हजारांवर गेली. त्यामुळे मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र मुंबईत पुन्हा एकदा कोरोना पूर्ण नियंत्रणात आला आहे. या स्थितीमध्ये सुधारणा झाल्यास तिसरी लाटही रोखली जाईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
मरीन लाइन्समध्ये फक्त 5 सक्रिय रुग्ण
कोरोना नियंत्रणात पालिकेच्या सी वॉर्ड मरीन लाइन्सने आघाडी घेतली असून कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. या वॉर्डमध्ये आतापर्यंत 6784 रुग्ण आढळले असले तरी यातील 6434 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 264 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या सी वॉर्डची स्थिती सर्वोत्तम असून या विभागात केवळ 5 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. सी वॉर्डचा डबलिंग रेट 2202 दिवस आहे.
सॅण्डहर्स्ट रोडमध्ये 6636 दिवस डबलिंग
सी वॉर्डनंतर बी प्रभाग सॅण्डहर्स्ट रोडमध्येही स्थिती सुधारत असून या ठिकाणीही केवळ 33 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. या ठिकाणचा रुग्ण दुपटीचा काळ मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6336 दिवस आहे. बी वॉर्डमध्ये आतापर्यंत 3888 रुग्ण आढळले 182 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र 3686 जणांनी कोरोनावर मात केली आहे.































































