
पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटांच्या धोकापातळीकडे सरकू लागली आहे. त्यामुळे जिल्हय़ावर महापुराचे सावट आहे. सांगली जिल्हय़ात कृष्णा, वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहे. कोयना धरणातील पाणीसाठय़ात अवघ्या 25 तासांत तब्बल 15 टीएमसीने वाढ झाली. पुणे जिल्हय़ातील मावळ पट्टय़ात पावसाचे थैमान सुरू आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात 18,400 क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला.
– कोल्हापूर जिल्हय़ात उद्या (दि. 23) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गगनबावडा तालुक्यात 24 तासांत 226 मि. मी. पाऊस झाला. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी झाली.
– जिल्हय़ातील 107 बंधारे पाण्याखाली. चार महामार्ग बंद. पंचगंगा नदीची वाटचाल धोकापातळीच्या दिशेने.
– कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हर फ्लो. ‘एनडीआरएफ’ची दोन पथके दाखल.
– पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर.
– सातारा जिल्हय़ात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून अवघ्या 25 तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात 15 टीएमसीने वाढ झाली. महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट आणि पूल पाण्याखाली गेल्याने 25 गावांचा संपर्क तुटला.
– सांगलीत कृष्णा, वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कृष्णेची पाणी पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता. चांदोली धरणातून 4883 क्युसेसने विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे अवाहन.
– पुणे जिल्हय़ातील मावळ पट्टय़ात भोर, वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्हय़ातील धरणांमध्ये पाणीसाठा 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून नदीमध्ये विसर्ग सुरू आहे.
































































