
सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू असल्याने संकटाचा पहाड कोसळला. पाटण, वाई, जावळी तालुक्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली. डोंगराचा भाग कोसळून आणि दरडी कोसळत असल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 35 नागरिक बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या खालचे आंबेघर येथे रात्रीच्या काळोखात दहा ते बारा घरांवर डोंगराचा भाग कोसळून 14 ते 15 जण गाडले गेले आहेत. मिरगाव येथे डोंगराचा भाग कोसळून त्याखाली 12 लोक बारा तासाहून अधिक काळ गाडले गेले आहेत. अशीच घटना वाई तालुक्यातील काsंढवळेजवळील देवरुकवाडी येथे घडली आहे. यामध्ये 29 जण गाडले गेले होते. त्यापैकी 27 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
कोयना धरणाचे दरवाजे 12 फूट उघडले, कराडला कृष्णा नदी इशारा पातळीपर्यंत
सातारा जिह्यातील कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज 12 फुटांपर्यंत उचलण्यात आले असून धरणातून 53 हजार 360 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे धोम धरणातून 8711, कण्हेर धरणातून 7219, उरमोडी धरणातून 5934, तारळी धरणातून 12,255, धोम बलकवडी धरणातून 4619 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिह्यात महापुराचे संकट गंभीर होत चालले आहे. जिह्यात अनेक पूल पाण्याखाली गेले असून नद्यांकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.























































