
>> डॉ. ऋतू सारस्वत
कोरोना लसीच्या संदर्भाने सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या अपप्रचाराचा प्रभाव एवढय़ा लवकर आणि सहजासहजी दूर होणार नाही. त्यामुळे लसीसंबंधी निर्माण झालेले संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने भरभक्कम प्रयत्न करायला हवेत. यासंदर्भात स्थानिक नेते, धर्मगुरू आणि सामान्य जनता ज्यांना आदर्श मानते त्यांचीही भूमिका याप्रश्नी महत्त्वाची ठरणार आहे.
कोरोनाच्या महामारीशी मुकाबला करीत असलेल्या हिंदुस्थानपुढे विविध पूर्वग्रहांशी दोन हात करण्याचेही आव्हान आहे. हे पूर्वग्रह नेहमीच हिंदुस्थानी ज्ञान आणि विज्ञानाला तुच्छ लेखत आले आहेत आणि त्याच पूर्वग्रहांनी निर्माण केलेले भ्रम आणि संशय यामुळे होणारे परिणाम कुणाच्याच हिताचे नाहीत. भ्रम आपोआप निर्माण होत नाहीत, तर ते जाणीवपूर्वक निर्माण केले जातात आणि त्यामागे कोणते ना कोणते कारण नक्कीच असते, हे मुद्दाम नमूद करायला हवे. परस्परविरोधी विचारधारा एकमेकांविषयी स्वार्थी हेतूंनी अफवा पसरवत नाहीत असा देश जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही; परंतु जेव्हा मानवी जीवनाच्या संरक्षणाचा विषय जिथे येतो त्या ठिकाणी स्वार्थ, प्रतिष्ठा आणि लालसा यांचे जोखड फेकून देणेच राष्ट्र आणि मानवाच्या हिताचे असते. सध्याच्या परिस्थितीत मानवी जीवन सुरक्षित राहावे, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. परंतु अशा काळातसुद्धा बेजबाबदार वक्तव्ये आणि भ्रम निर्माण करणारी विधाने सातत्याने केली जात आहेत हे दुर्दैवी आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये हिंदुस्थान आणि ब्राझीलचा समावेश आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी बुद्धिवादी आणि संवेदनशील लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु खरोखर असे होत आहे का? समाजात पसरलेल्या भ्रामक समजुती हाच कोरोना विषाणूशी लढण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे, यात कोणतीही शंका नाही. हिंदुस्थानातील माध्यमांच्या एका गटानेही लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून लसींबाबत शंका उपस्थित केली. एका मीडिया पोर्टलने ‘हिंदुस्थान की खतरनाक रिकव्हरी कॉकटेल’ शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या लेखात हिंदुस्थानी लसींच्या गुणवत्तेविषयी संशय व्यक्त केला होता. हिंदुस्थानी शास्त्रज्ञांच्या प्रतिभेला आणि अथक मेहनतीला आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचाच हा अप्रत्यक्ष प्रयत्न होता. याचा परिणाम असा झाला की, देशातील 49 शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी एक खुले पत्र लिहिले आणि लसीसंबंधी हिंदुस्थानी शास्त्रज्ञ समुदायाच्या प्रतिष्ठsवर आघात केल्याप्रकरणी रोष प्रकट केला.
सोशल मीडियाचा प्रसार जसजसा झाला तसतशा नकारात्मक बातम्या संपूर्ण देशात कशा पसरत गेल्या हा वर्णन करण्यायोग्य विषय नाही. परंतु त्याचे नकारात्मक परिणाम ताबडतोब समोर आले, हे उल्लेखनीय आहे. ‘मूडऑफ द नेशन पोल मार्केट रिसर्च एजन्सी कार्वी ‘इनसाइट’ने जानेवारी महिन्यात 19 राज्यांमधील 37 लोकसभा मतदारसंघांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार 21 टक्के लोक लस घेण्यास राजी नाहीत. ग्रामीण भागात लस न घेण्यासाठी दिले जाणारे तर्क वेगळे आहेत तर सुशिक्षित, महानगरी क्षेत्रातील लोक आपापले तर्क देतात. देशाच्या ग्रामीण भागात मुख्यत्वे असा तर्क दिला जात आहे की, लस घेतल्यानंतर पुरुष नपुंसक होईल किंवा त्यांची मुले अपंग होतील. अनेकांचा तर असा दावा आहे की, त्यांना लसीची गरजच नाही; कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत चांगली आहे. अशा मंडळींच्या मते, जे लोक सातत्याने आजारी असतात त्यांनाच लसीची गरज आहे.
दुर्दैवाची बाब अशी की, लसीबाबतच्या शंकाकुशंका आणि भ्रम ब्रिटनमधील हिंदुस्थानी समुदायातही पसरले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठासमवेत अनेक संस्थांनी मिळून नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले आहे की, 56 टक्के हिंदुस्थानींनी लस घेण्यात रस दर्शविला आहे तर 44 टक्के हिंदुस्थानीय लस घेण्यास एकतर नकार देत आहेत किंवा याबाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत ते नाहीत. यासाठी जी कारणे सांगितली जात आहेत, त्यात लसीबद्दलची माहिती नसणे हे प्रमुख कारण आहे. काही लोकांचे म्हणणे मात्र असे आहे की, त्यांना लसीची गरजच नाही आणि ज्यांना शारीरिक तक्रारी अधिक प्रमाणात आहेत त्यांनीच लस घेणे गरजेचे आहे. दक्षिण आशियाई समुदायांमध्ये लसीसंबंधीची माहिती आणि गैरसमज यांच्यात सीमारेषा आखणेही एक आव्हान बनले आहे.
लसीला विरोध करणारे काही लोक केवळ हिंदुस्थानातच आहेत असे नाही. लसींच्या विकासाचा आणि निर्मितीचा इतिहास जितका जुना आहे तितकाच लसीकरणाला विरोध करण्याचाही प्रदीर्घ इतिहास आहे. अठराव्या शतकाच्या मध्यापासून अखेरीपर्यंत इंग्लंड आणि अमेरिकेत स्मॉल पॉक्सच्या लसीला विरोध झाला आणि लसीकरणविरोधी लीगचीही स्थापना झाली. या विरोधामागे दिल्या जाणाऱया तर्कामागे धार्मिक आणि राजकीय कारणे होती. 1885मध्ये निघालेला ‘लिसेस्टर डेमोन्स्ट्रेशन मार्च’ हा लसीकरणाच्या विरोधातील सर्वाधिक प्रसिद्ध मोर्चांपैकी एक मानला जातो. 1879मध्ये ‘अँटी व्हॅक्सिनेशन सोसायटी ऑफ अमेरिका’ या संघटनेची स्थापना झाली. ब्राझीलमध्ये 1904मध्ये लसीच्या विरोधात उठाव झाला. जगभरात पसरलेले हे संघटित समूह कोणत्याही कारणामुळे लसीला विरोध करतात. अनिवार्य असणाऱया लसीकरणाला ते नागरी अधिकारांचे, व्यक्तिगत स्वातंत्र्याचे आणि स्वायत्ततेचे उल्लंघन मानतात.
लसीकरणाच्या माध्यमातून दरवर्षी जगभरात 20 ते 30 लाख लोकांचे प्राण वाचविले जात आहेत, ही बाब अनेक संशोधनांमधून उघड झाली आहे. वेळोवेळी लसीकरणाला विरोध झाला नसता आणि उर्वरित लोकांनीही लस घेतली असती तर वाचविल्या गेलेल्या जिवांची संख्या 45 लाखांपर्यंत गेली असती, असेही संशोधने सांगतात. वास्तव असे आहे की, लसीकरणाला विरोध करणाऱयांची संख्या खूपच कमी आहे; परंतु हे लोक अधिक सक्रीय आहेत. लसीकरणाविषयी या मंडळींनी पसरविलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे अनेक देशांमधील लसीकरण मोहिमांवर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. 2016मध्ये केरळ राज्यात डिप्थीरियाच्या विरोधात चालविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेवर भ्रामक भाकडकथांमुळे मोठा दुष्परिणाम झाला होता. एवढेच नव्हे तर कर्नाटक आणि तामिळनाडूत गोवर आणि रुबेला विषाणूंच्या विरोधात चालविल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेचेही मोठे नुकसान झाले होते. या मोहिमेत वापरण्यात येणाऱया लसींमध्ये पशूंच्या मांसाशी संबंधित काही पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे, असा गैरसमज काही जणांनी पसरविला होता.
2019मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने अँटी वॅक्स ग्रुप्स (लसीकरणविरोधी गट) आणि त्यांच्या अपप्रचारामुळे निर्माण होणारा संभ्रम ओळखून वैश्विक आरोग्याला असलेल्या सर्वात मोठय़ा धोक्यांमध्ये अशा अपप्रचारांचा समावेश केला होता. कोरोना लसीच्या संदर्भाने सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या अपप्रचाराचा प्रभाव एवढय़ा लवकर आणि सहजासहजी दूर होणार नाही. त्यामुळे लसीसंबंधी निर्माण झालेले संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने भरभक्कम प्रयत्न करायला हवेत. यासंदर्भात स्थानिक नेते, धर्मगुरू आणि सामान्य जनता ज्यांना आदर्श मानते, त्यांचीही भूमिका याप्रश्नी महत्त्वाची ठरणार आहे. त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, कोणताही तार्किक आधार नसताना कोरोना लसींबाबत गैरसमज पसरविण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी कडक धोरण अवलंबिले पाहिजे आणि हा अपप्रचार रोखला पाहिजे. कारण अखेर हा विषय मानवी जीवनाच्या रक्षणाशी संबंधित आहे.
(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)


























































