कोल्हापूरवरील महापुराचा विळखा सैल; राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, पाणी पातळी स्थिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुसऱया दिवशीही पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने पूरपातळीत तासाला इंचाइंचाने घट होत असून, जिल्ह्याला पडलेला महापुराचा विळखा हळूहळू सैल पडू लागला आहे. यंदा 56.3 फूट अशा रेकॉर्डब्रेक पाणीपातळी झालेल्या पंचगंगेची रविवारी संध्याकाळी सातपर्यंत पाणीपातळी 51.8 फूट झाली होती. शिवाय रविवारीही सायंकाळी उशिरापर्यंत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग शिरोलीपासून बंद होता. दरम्यान, ऐतिहासिक राधानगरी धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून 7 हजार 112 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी राधानगरीच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम असून, धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा सायंकाळी 3 वाजून 55 मिनिटांनी, तर दुसऱया मिनिटाला 3 नंबरचा दरवाजा उघडला होता. पुन्हा सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी धरणाचा 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. 5, 3, 6 क्रमांकांच्या दरवाजांमधून प्रत्येकी 1 हजार 428 क्युसेकप्रमाणे 4 हजार 284 व पॉवर हाऊसमधून 1 हजार 400 असा एकूण 5 हजार 684 क्युसेक विसर्ग सुरू होता. दरम्यान, 6 वाजून 56 मिनिटांनी 4 नंबरचा दरवाजा खुला झाल्याने, एकूण चार दरवाजांतून 7 हजार 912 क्युसेक विसर्ग सुरू होता.

जिल्ह्यातील 86 बंधारे अजूनही पाण्याखाली असून, कोल्हापूर ते रत्नागिरी, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव हे मार्ग अजूनही बंद आहेत. शिवाय कोल्हापूर ते हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, गारगोटी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी आदी तालुक्यांसह आंबा घाटचा मार्गही बंद आहे. दरम्यान, पाच ते सहा फूट पाणी आल्याने गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रविवारीही बंद राहिला. किणीपासून सातारापर्यंत हा मार्ग सुरू झाला असला तरी, पुलाची शिरोली आणि सांगली फाटा येथे अजूनही पाणी असून, रविवारी  पोकलेनद्वारे अवजड वाहतूक सुरू होते काय याची चाचपणी करण्यात आली. मात्र, पाण्याच्या प्रवाहाला जोर असल्याने येथून वाहतूक बंद होती.

पश्चिम भागात भूस्खलनाच्या घटना

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम भागात भूस्खलन मोठय़ा प्रमाणात झाले आहे. राधानगरी येथील भूस्खलनाच्या घटनेत एका दाम्पत्याचा आणि पाच पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना सोडली, तर इतरत्र जीवितहानी झाली नाही. ऐतिहासिक किल्ले पन्हाळावर जाणारा रस्ता यावेळी सलग दुसऱयांदा ढासळला. तर, बुरुजाकडील काही भागात दरडी कोसळल्या आहेत. शेतजमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, भूस्खलनाने पिके वाहून गेली आहेत. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे भूस्खलन होऊन, सुमारे 12 एकर शेती वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

दीड लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

जिल्ह्यातील नागाळा, दुधाळी, गांधीनगर, थावडे, कांचनवाडी, सरूड, पाटपन्हाळा, आवाडे मळा, शिरवाड व शिरटी ही 10 उपकेंद्रे बंद असल्याने 57 गावे पूर्णतः बाधित, तर 34 गावे अंशतः बाधित आहेत. यामुळे 95 हजार 735 ग्राहकांच्या वीजपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. 61 वीजवाहिन्या बंद तर, 1 हजार 272 वितरण रोहित्रे बंद आहेत. उच्चदाब वीज वाहिनीचे 89 व लघुदाब वाहिनीचे 183 वीज खांब पडले आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 61 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. शिये, राशिवडे व सातवे या उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

विशाळगड परिसरातील डोंगराला तडे

मुसळधार पावसाच्या तडाख्याचा फटका विशाळगडला बसला असून, भोसलेवाडी परिसरातील डोंगराचे भूस्खलन झाल्याने जमीन मोठय़ा प्रमाणात खचली आहे. परिणामी शेजारील घरांना तडे जाणे आदी धोका निर्माण झाल्याने परिसरातील राजन भोसले, लता भोसले, संदीप भोसले, अरुण भोसले, रमेश भोसले, योगेश भोसले, जगदीश अंगडी, किशोर भोसले, संतोष अंगडी, नीलेश हर्डीकर, दीपक गुरव ही 11 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर, याच परिसरातील करंजफेण येथे मातीच्या ढिगाऱयाखाली पेट्रोल पंप गाडला गेला आहे.