दोन दिवस लसीकरणाचे नो टेन्शन! दिवसाला एक लाखावर डोस देता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेला आज एक लाख 80 हजार लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळल्याने मंगळवारपर्यंत लसीकरणाचे टेन्शन मिटले आहे. त्यामुळे पालिकेला दररोज किमान 90 हजारांपर्यंत आणि खासगी रुग्णालयांतील डोस मिळून एक लाखावर डोस देता येणार आहेत. आगामी काळात अशा प्रकारे डोस उपलब्ध झाल्यास पालिकेच्या लसीकरणाला बेक लागणार नाही असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 71 लाखांहून अधिक नागरिकांना लस मिळाली आहे. पालिकेनेही लसीकरण वेगाने यंत्रणा उभी करून लसीकरण सुरू ठेवले आहे. दररोज दोन लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेही यंत्रणा उभारली आहे. विशेष म्हणजे दिवसाला दीड लाखावर डोस देऊन पालिकेने आपली क्षमताही सिद्ध केली आहे. मात्र लसींच्या तुटवडय़ामुळे पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार बेक लागत आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असून पालिकेच्या यंत्रणेचाही अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागात याचा मोठा परिणाम दिसत आहे. त्यामुळेच खासगी संस्थांच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. खासगी संस्था, सामाजिक संस्थांच्या ‘सीएसआर’ फंडातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, ऑगस्टअखेरीस कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संसर्ग सुरू होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार दररोज एक लाख नागरिकांना लस देणे अपेक्षित आहे.
पालिका म्हणते…

  • शुक्रवारी पालिकेला एक लाख 80 हजार कोविड लसींचा साठा मिळाला आहे. रविवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येते. त्यामुळे हा साठा मंगळवारपर्यंत पुरणारा असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
  • मुंबईत 95 लाख लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत 71 लाख 21 हजार 950 नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी 53 लाख 86 हजार 267 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर 17 लाख 35 हजार 683 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
  • मुंबईत 11 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी नऊ लाख 96 हजार 282 ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर सहा लाख 12 हजार 737 ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.