
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान डबी नदीवरील पिंपळवाडी धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. धरणाला गळती नसल्याने धरणाखालील गावांना कोणताही धोका नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाने येथील काही वाड्याना स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले असल्याने येथील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत.
खेड तालुक्यातील डुबी नदीवरी बांधण्यात आलेले पिंपळवाडी चल हे गेली अनेक वर्ष या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेले धरण आहे. धरणाच्या काम सुरु होऊन अनेक वर्षे उलटली तरी हे धरण अद्याप 100 टक्के पूर्णत्वास गेलेले नसल्याने या धरणातील पाण्याचा एकही थेंब सिंचनासाठी वापरला जात नाही. मात्र धरणातील पाण्यामुळे अनेकांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे.
21 आणि 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाला. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंत अर्धवट अवस्थेत असल्याने धरणाच्या दरवाजातून विसर्ग होत असलेले पाणी थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले. या पाण्याचा दाब इतका होता की, त्यामुळे धरणाच्या भितींचा काही भाग ढासळून अश्मपटलाला धोका निर्माण झाला.
ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून खेडचे प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने यांनी धरणाच्या लाभ क्षेत्रात नदीकिनारी असलेल्या सात गावातील शेकडो ग्रामस्थाना स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले. धरणाच्या भिंतीचा काही भाग ढासळाल्याने निर्माण झालेली परिस्थिती अतिशय धोकादायक होती. पाऊसही सुरुच होता त्यामुळे ग्रामस्थांची भिती क्षणाक्षणाला वाढत होती.
पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. धरणाला कुठेही गळती नसल्याने धरण फुटण्याचा धोकाही उरलेला नाही. पाटबंधारे विभागाकडून ग्रामस्थांना अशा प्रकारे दिलासा दिला जात असला तरी पावसाचा जोर अद्याप कमी झालाय असे म्हणता येत नसल्याने येथील ग्रामस्थांना आजही भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे.

























































