
कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस बऱयाच नागरिकांनी घेतला असून काहींनी दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका पाहता भविष्यात मात्र तिसरा बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे का? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आज राज्य सरकारला केली.
कोविडसंदर्भातील अनेक समस्यांवर मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्ती म्हणाले की, राज्य सरकारसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत कोविड टास्क फोर्सने सांगितले होते की, कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले असले तरी नागरिकांना कोरोना व्हायरसच्या अनेक प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लसीच्या तिसऱया किंवा बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते. त्यामुळे तिसरा बूस्टर डोस केव्हा घ्यावा लागेल ते तपासा. टास्क फोर्सने म्हटले होते की, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस मिळाल्यापासून दहा महिने आणि दुसऱया कोव्हॅक्सिन डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागेल. अजूनही तसेच आहे का? की या कालावधीत बदल झाला आहे. त्यावर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी पुढील सुनावणीवेळी माहिती देणार असल्याचे खंडपीठाला सांगितले.
लस सर्टिफिकेटमध्ये चुका
अॅड. अनिता कॅस्टिलिनो यांनी बाजू मांडताना सांगितले की, लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र केंद्र सरकारद्वारे दिले जाते. मात्र या सर्टिफिकेटमध्ये नावात आणि बॅच क्रमांकात अनेक चुका असल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने याची दखल घेत केंद्र तसेच राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले व सुनावणी 23 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
































































