
राज्यात कोरोनाचा फैलाव काही प्रमाणात आटोक्यात येत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात मात्र कोरोना संसर्ग अद्यापि आटोक्यात आलेला नाही. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, रोज आढळणाऱया रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यातच आजच्या कामिका एकादशीनिमित्त पंढरपुरात आणि भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याने कोरोना आटोक्यात कसा येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणच्या गर्दीत अनेकांनी मास्क घातल्याचेही दिसून येत नव्हते.
वारकरी संप्रदायामध्ये कामिका एकादशीला वेगळे महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या काळामध्ये पंढरपुरात संचारबंदी होती. अनेक भाविकांना इच्छा असूनही पंढरपूरमध्ये येता आले नव्हते. बुधवारी कामिका एकादशीनिमित्ताने राज्याच्या विविध भागांतून 50 हजारांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. दरम्यान, एकीकडे भाविकांनी गर्दी केली असली तरी पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मंदिर कोरोना निर्बंधांमुळे बंद आहे. त्यामुळे भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मंदिर परिसरातील प्रसादविक्रीची दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणाऱया सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. पोलीस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचनासुद्धा दिल्या जात आहेत. मात्र, भाविकांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदींच्या वापराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते.
सोलापूर जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाजार समिती शहर परिसरात आहे. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम शहरवासीयांनाही भोगावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात निर्बंध कायम असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, भाजी खरेदीसाठी व विक्रीसाठी मोठय़ा संख्येने येत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आवश्यक असताना मात्र बाजार समितीचे प्रशासन व शहर-जिल्हा प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वीही बाजार समितीतील गर्दीविरुद्ध प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला आहे. दररोज सकाळी बाहेरून नागरिकांची यानिमित्ताने ये-जा सुरू असल्याने शहरातही कोरोनाचा प्रसार तीक्रतेने वाढेल, अशी भीती गर्दी पाहून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मृत्यू आणि कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने व या गर्दीचा फटकाही बसत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व जमावबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गर्दीवर कुणाचेच नियंत्रण नाही
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सकाळी भाजीविक्री व खरेदीसाठी तुफान गर्दी होत आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वारंवार फज्जा उडत असून, गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. जमावबंदीबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा शहर व ग्रामीण भागात लागू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना कोरोनाचा विस्फोट करणारे बाजार समितीतील ही गर्दी जिल्ह्याची चिंता वाढवित आहे.



























































