
मालवण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. हा ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये 30 कि.मी. धावणार असून त्याची वजन उचलण्याची क्षमता 300 किलोपर्यंत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर वरदान ठरणार आहे.
कणकवली तालुक्यातील हळवल येथे राहणाऱ्या आणि मालवण पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या शरद जाधव, सुमेध कासले तसेच आयटीआय आरोसमधील सुमेध जाधव या तिघांच्या संकल्पनेतून मिनी ट्रॅक्टर बनवण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना मालवण पॉलिटेक्निकमधील शेवटच्या वर्षातील 14 विद्यार्थ्यांच्या ग्रुपची मदत मिळाली. तसेच पॉलिटेक्निक कॉलेजचे सिंग सर, योगेश महाडिक, कणकवली एसटी आगारातील दशरथ कृष्णा जाधव, विजतत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे. इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला असून अंदाजे 35 ते 37 हजारांपर्यंत खर्च आला आहे. पुढील काळात या मिनी ट्रॅक्टरचा शेतीतील विविध कामांसाठी उपयोग होऊ शकतो.























































