कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये तीस महिन्यांच्या अर्जुन हत्तीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शुक्रवारी आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

नुकतेच 3 आगस्ट रोजी ‘सई’ या हत्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूचं नेमक कारण काय हे अजूनही कळले नाही. शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच आज आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शुक्रवारी अचानक मृत्यू झालेल्या हत्तीचे नाव ‘अर्जुन’ असून मंगला या हत्तिणीने 15 जानेवारी 2019 ला मकर संक्रांतीचा शुभ पर्वावर जन्म दिला होता. त्याचे नामकरण करून ‘अर्जुन’असे नाव ठेवण्यात आले होते. केवळ तीस महिन्याचा अर्जुन या नावाच्या हत्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही.

मात्र, अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये नेमकं चाललंय तरी काय ? असा सवाल वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे. 29 जून 2020 ला ‘आदित्य’ नावाच्या 4 वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. 11 जूनला आदित्य हा चिखलात अडकला आणि त्याची प्रकृती बिघडली होती. वन विभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आदित्य पाईपलाईनच्या खड्ड्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कमलापूर वनपरिक्षेत्राच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

त्यानंतरही येथील कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नव्हती. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी ‘सई’ नावाच्या 32 महिन्यांचा हत्तिणीचा मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही, त्या दरम्यान आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याने आता सिरोंचा वनविभागाचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.