नाटय़क्षेत्रासाठी ‘ओटीटी’चे दार खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नक्हे, तर बॉलीवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. नाटकवेड्या प्रेक्षकांसाठी ‘नाइन रसा’ ही रंगभूमीशी निगडित वेगळी संकल्पना श्रेयसने आणली आहे. नाटक ही कला करोनाकाळात आणि त्यानंतरही अव्याहत सुरू राहावी यासाठी नाटकासाठी स्वतंत्र ‘ओटीटी’चे हे माध्यम आहे. हिंदी, मराठी, गुजराती नाटक, एकांकिका, दीर्घांक, अभिवाचन, नृत्य, गायन, कविता हे सर्व कलाप्रकार आणि सोबतच पाश्चात्य भाषेतील कलाकृतीही प्रेक्षकांना या प्लॅटफॉर्मकर पाहायला मिळतील.

‘नाइन रसा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल काय सांगशील?

– मागचं संपूर्ण वर्ष आपण लॉकडाऊन अनुभवलं. या काळात तेव्हा फिल्म, नाटक, थिएटर सगळंच बंद झालं. तेव्हा या क्षेत्रांच्या भविष्याबाबत काहीच अंदाज बांधता येत नव्हता. मराठी रंगभूमीबाबतही या काळात प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अर्थात हा काळ फार टिकणार नाही हे माहीत असलं तरी यातून बाहेर पडण्याची आवश्यकता होतीच. याचा विचार करताना आणि रंगभूमीबद्दल असणारी स्वाभाविक ओढ यातूनच नाटक वा रंगभूमीलाही डिजिटल फॉर्ममध्ये का आणू नये असं वाटलं. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांनी मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं. मात्र यात ते नाटक हा फॉर्म कुठंच दिसत नव्हता. हे लक्षात आल्यानंतर नाटकही ओटीटीवर आणलं जावं असा विचार आला. याची दोन कारणं होती. एक म्हणजे हे नाटय़क्षेत्र हा एक व्यवसायही आहे. तो थांबता कामा नये. आणि दुसरं म्हणजे, नाटक सर्वदूरपर्यंत पोहोचावं. प्रत्यक्ष सादर होणारं नाटक तर पाहिलं जाईलच, परंतु ज्यांना ते शक्य होणार नाही त्यांनाही नाटक पाहण्याचा आनंद घेता येईल.

अनेकांना नाटक पाहण्याची इच्छा असते. जगभरात मराठीच नव्हे, तर इतर भाषेतील नाटकांचाही चाहतावर्ग आहे, पण सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. अशा वर्गासाठी ‘नाइन रसा’ ओटीटी प्लॅटफॉर्म ही पर्वणी ठरेल यात शंका नाही. सध्या आपल्यावर सगळय़ात महत्त्वाचे निर्बंध आहेत ते प्रवासाचे. अशा वेळी एका क्लिकवर नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल या उद्देशाने आम्ही ‘नाइन रसा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली, जे नाटक व परफॉमिंग आर्टमधील जगातील पहिलेवाहिले व्यासपीठ ठरले आहे.

नाटय़क्षेत्र आणि ओटीटीबद्दल तुझं काय मत आहे?

– ओटीटी म्हणजे खरं तर तंत्रज्ञान आणि प्रयोगशीलता याचा मिलाफ. इतकी वर्षं आपण नाटक प्रत्यक्ष सादर होताना पाहतोय. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल थोडीशी साशंकता वाटू शकते. पण काळ बदलतोय. त्यामुळे वेगळी माध्यमंही स्वीकारायला हवीत. त्यातली प्रयोगशीलता जपायला हवी. आणि अर्थात ओटीटीवर नाटक पाहिलं गेल्याने ती प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद कमी होणार आहे का, तर नाही. नाटकाला एका साच्यात न अडकवता त्याला तंत्रज्ञानाशी जोडल्याने नाटक सर्वदूरपर्यंत पोहोचेल हे नक्की.

‘नाइन रसा’ला प्रेक्षकांचा आणि नाटय़क्षेत्राचा कसा प्रतिसाद लाभला आहे?

– आमच्या या प्लॅटफॉर्मला खूप छान प्रतिसाद लाभला आहे. नाटकाचा प्रेक्षकवर्ग पाहता आधी 35 च्या पुढचा वर्ग पसंती दर्शवेल असा अंदाज होता; परंतु अगदी 18 वयापासूनच्या प्रेक्षकांनीही याला प्रतिसाद दर्शवला आहे. यामुळेच आमचा उत्साहही वाढला आहे. नाटक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून साध्य होतोय हे खूप महत्त्वाचं आहे. नाटय़क्षेत्रातूनही या संकल्पनेचं स्वागत केलं आहे. या क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक सोबत काम करत आहेत. त्यामुळे एक आशावादी चित्र उभं राहत आहे.

कोणकोणत्या स्वरूपाचं सादरीकरण या माध्यमातून केले जाणार आहे?

– ‘नाइन रसा’ हा नाटकांसाठीचा प्लॅटफॉर्म आहेच; परंतु यासोबत एकांकिका, कथा, कविता, माहितीपट, दीर्घांक, अभिवाचन, गाण्याचे कार्यक्रम असे परफार्ंमग आर्टमधील सर्व काही यावर असणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, हिंग्लिश असा विविध भाषिक असा हा प्लॅटफॉर्म आहे. नवी, जुनी अशी अनेक नाटकं, कार्यक्रम यावर दाखवले जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या वर्गातील प्रेक्षकांना हे निश्चितच आवडेल.

‘नाइन रसा’ हा नाटकाचा प्लॅटफॉर्म आहे. ‘नाइन रसा’ म्हणजे रंगमंचावरील नवरसांची पूर्तता करणाऱ्या सर्व कला. म्हणूनच रंगभूमी, नाटय़कला याच्याशी निगडित हे नाव ठेवले गेले.

वेगळे माध्यम निवडताना यासाठी पूर्वतयारी काय केली?

– नाटकाची अभिजातता, त्या क्षेत्राचं पावित्र्य राखले जावे हा महत्त्वाचा मुद्दा होता. मुळात नाटक वेगळय़ा माध्यमातून दाखवायचं, पण ते नाटकासारखंच दाखवलं जावं हा आग्रह होताच. त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांचं चित्रीकरण केलं गेलं. याबरोबरच त्यांचं नेपथ्य, प्रॉपर्टीज या गोष्टींबाबत काळजी घेतली गेली. यासाठी वेगवेगळे सेट तयार केले. प्रीप्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन यात योग्य दर्जा सांभाळण्याचा आणि त्यायोगे व्हिज्युअल क्वालिटी देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. यातला सगळा कन्टेन्ट मूळ स्वरूपातला आणि त्यानंतर नव्याने चित्रीकरण केलेला आहे. काही जुनी नाटकं, काही नवीन नाटकंही यात आहेत. काही जुन्या नाटकांचे राइट्स घेतले आहेत. नवीन लेखकांच्या संहिता, नाटकंही तयार आहेत.

कोणती नवीन नाटकं तयार आहेत?

– आमच्याकडे सध्या 100 तासांचा कन्टेन्ट तयार आहे. स्टॅण्ड अप कॉमेडी, नाटक, एकांकिका, कथा यात आहेत. सध्या रत्नाकर मतकरी यांचं साहेबजी डार्लिंग,  फणसळकर यांचं एकांकिका गिऱ्हाईक, प्रदीप राणे यांचं युरेका युरेका अशी मराठी नाटकं तयार आहेत. व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर अशा सर्व रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी यात बरंच काही असणार आहे. या क्षेत्रातील प्रयोगशीलता राखण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे.

मराठी रंगभूमीबद्दल आणि सध्याच्या स्थितीबद्दल काय वाटतं?

– मराठी नाटकांवर प्रेक्षकांनी आणि नाटकवेड्यांनी कायम प्रेम केलं आहे. आपली नाटकं, संहिता या सगळ्याचा दर्जा खूप उच्च आहे. त्यातला जिवंतपणा हा कायम अबाधित राहणारा आहे. त्यामुळे काही काळापुरती जरी रंगभूमी बंद असली तरी ती पुन्हा सुरू होताना प्रेक्षकांचं तितकंच प्रेम तिला लाभेल यात शंका नाही. मात्र आता नाटय़क्षेत्र लवकरात लवकर पूर्ववत व्हावं आणि प्रेक्षकांना तो अनुभव घेता यावा असंच वाटतं. याबरोबरच ओटीटी हे माध्यमही आहेच, जे तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टींसह तुम्हाला उपलब्ध आहेच. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ‘नाइन रसा’चा प्रयत्न कायमच राहील.

[email protected]