
>> ए. के. सावंत
मराठी साहित्यामधील प्रसिद्ध लेखिका, मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा व मध्यमवर्गीय सामान्य जनमनाच्या मनातील व्यथा आपल्या लेखनीतून मांडणाऱ्या डॉ. विजया वाड यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी पुस्तक वादळवाट. हे पुस्तक संकटाच्या छाताडावर उभं राहून विजयश्री प्राप्त करणाऱया कर्मयोगी व शिक्षण क्षेत्रातील नामांकित नाव असणारे रमेश खानविलकर यांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेले आहे.
‘वादळवाट’ पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ. विजया वाड यांनी लिहिलेली कविता या पुस्तकाचा आशय सांगून जातो. खरंतर ‘‘वादळवाट’’ हे पुस्तक शाळेत व महाविद्यालयात जाणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचणे आवश्यक आहे.
रमेश खानविलकर यांनी अत्यंत गरिबीत घासलेटच्या दिव्यावर अभ्यास करून, घरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी साधी अर्धी भाकरीसुद्धा नसलेल्या घरात साजरी झालेली दिवाळी म्हणजे नयनातून आपोआप अश्रू वाहत जातील असे केलेले लेखन सामान्य गोरगरीबाच्या घरात दिवाळी सण कसा जातो हे हृदयाला स्पर्शून जाते. वयाच्या 21 व्या वर्षी स्थापन केलेली शिक्षण संस्था व 25 व्या वर्षी सुरू केलेली पहिली 100 टक्के अनुदानित शाळा व ती शाळा उभारताना झालेल्या विघातक शक्तीबरोबरचा संघर्ष, झालेले प्राणघातक हल्ले, आलेली संकटे व त्यातून सिद्धिविनायकाच्या कृपेने रमेश खानविलकर यांनी काढलेला मार्ग यांचे लिखाण अप्रतिम व वाचकांची उत्कंटा वाढवणारे असे आहे. प्रत्येक प्रकरण पुढे काय? म्हणून वाचक स्वप्रेरणेने प्रत्येक प्रकरण वाचत जातो.
‘‘माझी माय’’ या प्रकरणात 8/9 वर्षांचा मुलगा आपल्या आईसोबत जगण्यासाठी करत असलेला संघर्ष तेवढय़ाच ताकदीने लेखिकेने मांडला आहे. तर “माझे अण्णा गेले’’ हे प्रकरण तर डोळ्यांतून पाणी आणणारे आहे.
‘‘माझे बालपणातील व्यवसाय’’ हे प्रकरण तर आजच्या विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या डोळ्यात अंजन घालण्याच्या ताकदीचे आहे. रडत व कुडत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीवर कशी मात करायची हे या प्रकरणातून दिसून येते. वयाच्या 7/8 व्या वर्षी आपल्या गरीब आईवडिलांच्या संसाराला हातभार लावणाऱ्या व त्याही परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करणाऱया रमेश खानविलकर ही व्यक्तिरेखा पाहण्याची इच्छा वाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षण संस्था काढणे व पुढे ती वाढवणे तिचा नावलौकिक वाढवणे व तेसुद्धा बिगर राजकीय व्यक्तीने ज्याच्याकडे फक्त 34 रुपये होते. त्या 34 रुपयांच्या जोरावर महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था यशस्वीरीत्या चालविता येऊ शकते, गरिबीवर मात करता येऊ शकते. पण यश मिळाल्यानंतर ही त्या यशात सर्वाना समावून घेणारी म्हणजे ‘‘वादळवाट.’’ संकटांना न घाबरता त्यांना संधी समजून त्या संकटाशी सामना करून त्याच्या छाताडावर बसून विजयश्री प्राप्त करणारी कथा म्हणजे ‘‘वादळवाट…’’ एक दीपस्तंभ. वाचकांनी खासकरून युवक व विद्यार्थ्यांना यातून एक नवी दिशा प्राप्त होईल.



























































