
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच नागरिकांना आता थेट पदक विजेत्या खेळांडूपर्यंत शुभेच्छा पोहोच करण्याची सोय पुणे टपाल विभागाने उपलब्ध करून दिली असून शहरातील सर्व टपाल कार्यालयातून नागरिकांना शूभेच्छा पाठविता येणार आहेत. स्वतःच्या नावासह लिहीलेला हा संदेश टपाल विभागामार्फत खेळांडूच्या घरी छापील स्वरुपात पोहोच केला जाणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा या खेळाडूने शनिवारी ‘भाला फेक’ मध्ये सुवर्णपदक मिळविले. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानू, बजरंग पुनीया, पी. व्ही. सिंधू, लव्हलिना बोर्गोहेम, रवी कुमार दहीया, हिंदूस्थानी पुरूष हॉकी संघाने बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर खेळाडूंपर्यत शुभेच्छा पोहोचविण्यासाठी पुणे टपाल विभागाने एक विशेष ई – पोस्ट सुविधा राबविली आहे. यामाध्यमातून नागरिक आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयातून खेळाडूला शुभेच्छा संदेश पाठवू शकतात. यासाठी दहा रुपये फि आकारण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपल्या नावासह संदेश लिहून पोस्टात जमा केल्यानंतर तो ई – पोस्टाच्या माध्यमातून संबंधित खेळाडू राहत असलेल्या क्षेत्रीय पोस्ट कार्यालयात पाठविला जाईल. त्यानंतर संबंधित ठिकाणी तो संदेश छापील स्वरुपात पोस्टमनच्या माध्यमातून थेट खेळाडूंच्या घरी पोहोच केला जाणार आहे. ही सुविधा पुणे विभागातील 370 टपाल कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल जी. मधुमीता दास यांनी दिली.





























































