
नशेबाजाने स्वतःवर ब्लेडने वार करून गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना बुधवारी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात घडली. लेकराम मेहरा असे जखमी जवानाचे नाव आहे. घडल्याप्रकरणी सलीम शेख या नशेबाजाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्क कार्यालयात सकाळी एक व्यक्ती तिकीट घेण्यासाठी आला, मात्र त्याला तिकीट देण्यात आले नव्हते. त्याचदरम्यान सलीम हादेखील तेथे आला. सलीमने तिकीट क्लर्कशी वाद घालण्यास सुरुवात केली. बुकिंग क्लर्कने याची माहिती आरपीएफला दिली. त्यानंतर काही वेळातच गस्तीवर असलेले लेकराम हे तेथे आले. तेव्हा सलीमने खिशातून ब्लेड काढून स्वतःवर वार केला. स्वतःवर वार केल्यानंतर सलीमने लेकराम याच्या छातीवर आणि हातावर ब्लेडने हल्ला केला.






























































