
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेती अवजाराचा लाभ मिळण्यासाठी लॉटरी लागली खरी. मात्र, गरज नसलेल्या बाबीसाठी निवड झाल्यासह अन्य कारणाने यंदा निवड झालेल्या अर्ध्या शेतकऱयांनी या योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे. निवडीचा संदेश आल्यानंतर तीस दिवसांत लाभ घेणे बंधनकारक आहे. यंदा निवड झाली; परंतु लाभ घेण्यास नकार देत असलेल्या शेतकऱयांचा शोध घेऊन ‘मला लाभ नको आहे’ असे लेखी पत्र कृषी विभागाकडून घेतले जात आहे. त्यानंतर लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुढील लाभार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया होईल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. एकटय़ा नगर जिल्ह्यात 1 हजार 20 शेतकऱयांनी तसे पत्र लिहून दिले आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यंदा राज्यात 11 लाख 84 हजार 242 अवजारांसाठी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात सर्वाधिक टॅक्टरसाठी 3 लाख 87 हजार 281 अर्ज आहेत. त्यात फलोत्पादन विभागाकडील बाबीसाठीही अर्जाची संख्या मोठी आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता राज्यात सर्वाधिक 1 लाख 91 हजार 806 शेतकऱयांनी यांत्रिकरणातून अवजारासाठी अनुदानाची मागणी केली आहे. आयुक्तालय स्तरावरून प्राप्त अर्जातून लॉटरी काढून लाभार्थी निवड केली व संबंधित शेतकऱयांना निवड झाल्याचे संदेश दिले. संदेश आल्यानंतर अवजार खरेदीची कंपनी निवड, तपासणी अहवाल, सात-बारा, आठ अ उतारा, मंडळ व तालुका कृषी अधिकारी तपासणी, पूर्वसंमती व खरेदी करून मोका तपासणी या बाबी तीस दिवसांत होणे
गरजेचे आहे.
मात्र, दोन महिन्यांचा कालावधी झाला तरी अनेकांनी बाबी पूर्ण केल्या नाहीत. अवजार खरेदीसाठी अनुदानाची लॉटरी लागलेले 50 टक्के शेतकरी लाभ घेण्यास नकार देत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नगर जिल्ह्यात यंदा शेतकऱयांनी लाभ नको असे लिहून दिले असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. ठिबक सिंचन अनुदानासाठी 19 हजार 270 अर्ज आले. त्यातील 2080 शेतकऱयांची निवड झाली आहे.
एका क्लिकमुळे वाढते अर्ज संख्या
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत शेती अवजाराचा लाभ मिळण्यासाठी पूर्वी शेतकऱयांकडून योजनेसाठी ऑफलाइन अर्ज घेतले जात होते; परंतु दोन वर्षांपासून ऑनलाइन अर्ज घेतले जात आहेत. त्यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल विकसित केले असून, एकाच क्लिकवर एकापेक्षा अधिक बाबींची मागणी करता येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी गरज असलेल्या बाबीसोबत अन्य बाबीचीही मागणी करतात. त्यामुळे मागणी करणाऱया अर्जांची संख्या वाढत असल्याचे कृषी विभागातील एका अधिकाऱयाने सांगितले.
हजारो शेतकऱयांना प्रतीक्षा कायम
यांत्रिकीकरण उपअभियानातून ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अन्य कृषी अवजाराचा लाभ मिळावा यासाठी दरवर्षी अर्ज करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढत आहे. एकाच पोर्टलवर नोंदणी केली जात असल्याने अर्ज संख्या दोन लाखांपर्यंत जात असली, तरी प्रत्यक्ष लाभाची गरज असलेल्या व प्रतीक्षेतील शेतकरी संख्या 1 लाखांच्या घरात आहे. मात्र, प्राप्त अर्जाचा विचार करता निवड झालेल्या शेतकऱयांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. एकटय़ा नगर जिल्ह्यात ट्रक्टरची 66,122, पॉवर टिलरची 15 हजार 799, अन्य कृषी अवजारांची 1 लाख 9 हजार 590 शेतकऱयांनी मागणी केली. कृषी अवजारे बँकांची मागणी करणाऱया शेतकरी कंपन्यांची संख्या 295 आहे. निवड लाभार्थ्यांची संख्या पाहता लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.




























































