रत्नागिरीतून आतंरराष्ट्रीय व्हॉईस कॉल; मुंबई एटीएसमुळे टोळीचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दूरसंचार यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करून आतंरराष्ट्रीय व्हाईस कॉल रत्नागिरीतून होत असल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळताच एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमांईड सह एकाला अटक केली आहे.
 रत्नागिरीतून आतंरराष्ट्रीय व्हॉईस कॉल होतात अशी माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. ही माहिती त्यांनी रत्नागिरी पोलिसांना दिली. यानंतर रत्नागिरी आठवडा बाजार येथील श्री टेक मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. यासाठी एका कंपनीचे कनेक्शन घेण्यात आले होते. मुंबई एटीएसने माहिती काढलेल्या या इंटरनॅशनल कॉलिंगचा पर्दाफाश करताना धक्कादायक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. सर्व्हर रत्नागिरीत आणि कॉलिंग सेंटर वांद्रेमधील एका इमारतीत सुरू होते. वाईप द्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमी ही पद्धत वापरली जाते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रत्नागिरीतून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकानमालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील मास्टर माईंड ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीसीला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम 420, 34, आयटी ऍक्ट 43(ह), 66(ड), इंडियन टेलिग्राफीक ऍक्ट 4, 20, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.