
>> प्रा. सुनील कदम
भीती, मृत्यू, देव, रहस्यमय या चार शब्दांची सांगड म्हणजे साप. पर्यावरणात सापाचे महत्त्व फार मेलाचे आहे. देशातील 30 टक्के अन्नधान्य उंदीर खातात. उंदरामुळे प्लेग, लेप्टोसारखे रोग पसरतात. अशा या उपद्रवी उंदरांचा नायनाट नैसर्गिकरीत्या साप करतात. सापाच्या विषापासून अनेक औषधे बनतात. साप माणसांवर उपकारच करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाते. हिंदुस्थानी संस्कृतीत पृथ्वी ही शेषनागाच्या फणावर उभी आहे असे मानले जाते, म्हणूनच सापाला देव मानून त्याची पूजा केली जाते. याचा गर्भित अर्थ सृष्टीचा पाया साप आहे. जर सृष्टीतून साप नष्ट झाले तर पृथ्वी नष्ट होईल. पर्यावरणाचा समतोल बिघडेल. मात्र दुसरीकडे अज्ञान-अंधश्रद्धेतून सापाची मोठय़ा प्रमाणात हत्या केली जाते. ती थांबवावी. लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनेक सर्पमित्रांच्या संस्था, संघटना साप संवर्धन व संरक्षणाचे कार्य वनविभागाच्या परवानगीने व मार्गदर्शनाखाली काम करत असतात. यासाठी वनविभागाने सर्पमित्रांची मुंबई, ठाणे विभागांसाठी नियुक्ती केली असून त्यांना सर्पमित्राचे ओळखपत्रही दिलेले आहे.
परंतु मागील काही वर्षांत असे आढळून आले आहे की, अनेक शालेय तसेच महाविद्यालयीन मुले हौस म्हणून, टाइमपास म्हणून साप पकडू लागले आहेत. अशा हौशी सर्पमित्रांच्या टोळय़ा काही लबाड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैसे कमविण्यासाठी सर्पमित्राचा बुरखा पांघरून एन.जी.ओ.च्या नावाखाली संघटितरीत्या चालवीत आहेत. सर्पमित्रांच्या नावाखाली गैरव्यवहार करीत असल्याचे आढळून येत आहे. हे सर्पमित्र स्थानिक पोलीस, फायरब्रिगेड यांनाही चकवा देत असल्याचे आढळून येत आहे. विनाकारण, विनापरवाना साप पकडणे वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा आहे. अप्रशिक्षित व्यक्ती सर्प पकडताना आपला जीव धोक्यात घालत आहेत. अनेक तथाकथित सर्पमित्र सापांच्या गैरव्यवहारात गुंतलेले आढळत आहेत. मांडूळ या दुतोंडी सापाची मंत्रमंत्रासाठी तस्करी करणे, सापाची कातडी परदेशात विकणे, सापाचे विष विकणे, सापासोबत स्टंट करणे, टिकटॉक, फेसबुक, सोशल मीडियावर हिरोगिरी करणे या सर्व उपद्रवामुळे सर्पसृष्टी धोक्यात आलेली आहे. अशा घटनांमुळे मागील 30-40 वर्षे सर्पसृष्टीच्या संरक्षण व संवर्धनासाठी जे प्रामाणिक, निःस्वार्थी सर्पमित्र काम करीत आहेत त्या सर्पमित्रांकडेही सामान्य जनता संशयाने पाहू लागली आहे.
पूर्वीचे गारुडी नागपंचमीच्या दोन दिवस आधी मुंबईच्या कामाठीपुराच्या नाक्यावर नागमंदिरासमोर सर्पविक्रीचा बाजार भरवीत. दात तोडलेले विषारी नाग महाराष्ट्राच्या विविध भागांतून काही लोक 100 ते 200 रुपयांना विकत घेत व टोपलीतून गावातून, शहरातून ‘नागोबाला दूध पाजा’ असे म्हणून फिरत असत व हजारो रुपये कमवीत असत. काही गारुडी रस्त्यावर खेळ करत व पैसे मागून पोट भरत. या सर्व पारंपरिक सापाचा खेळ खेळणाऱया गरीब गारुडय़ांचे खेळ बंद पडले. ते गारुडी टोपलीत मेहनत करून पैसे जमा करत तर आजकालचे सुशिक्षित ‘गारुडी’ झोल करून पेटीएममध्ये पैसे जमा करतात. या तथाकथित सर्पमित्रांचा वनविभागाने आणि सामान्य जनतेने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.
(लेखक सर्पमित्र आहेत.)





























































