
सोलापूर शहर व परिसरात जबरी चोरी करणाऱया तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. समीर फारूख इनामदार, विशाल छबुगाडे, अभिषेक मोतीराम राठोड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मार्केटयार्ड, हैदराबाद रोड परिसरात चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना मार्केटयार्डाजवळ एका दुचाकीवरून संशयास्पदरीत्या जात असताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपी समीर फारूख इनामदार (रा. मुळेगाव तांडा), विशाल छबू गाडे, अभिषेक मोतीराम राठोड (दोघे रा. मुळेगाव तांडा, द. सोलापूर) यांनी मार्केटयार्ड, जोडभावी पेठ, हैदराबाद रोड आदी परिसरात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल, मोटारसायकल असा 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जोडभावी पेठ व जेलरोड पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. हे तिघे सराईत गुन्हेगार असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.






























































