
मुंबईत कोरोना अजून पूर्णपणे नष्ट झाला नसताना गेल्या साडेसात महिन्यांत तब्बल 39 हजार 481 ठिकाणी डेंग्यू तर 7 हजार 922 ठिकाणी मलेरियाच्या अळ्या सापडल्याची माहिती समोर आली आहे. कीटकनाशक खात्याकडून यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीत डास निर्मूलनासाठी 12038 टायर्स तर 2 लाख 80 हजार 987 ठिकाणच्या वस्तू हटवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घर किंवा परिसरात, उघडय़ावर पाणी साचू देऊ नका असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरे व परिसराची तपासणी पालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येते. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशक खात्यातील कामगार – कर्मचारी-अधिकारी हे तपासणीचे लक्ष्य निर्धारित करून नियमितपणे तपासणी करतात. या खात्याद्वारे जानेवारी पासून ते आतापर्यंतच्या साडेसात महिन्यांच्या कालावधी दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल 39 हजार 481 ठिकाणी ’एडिस एजिप्ती’ या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या; तर 7 हजार 922 ठिकाणी मलेरिया वाहक ’?नॉफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या आढळून आल्या असून ही डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आल्याची माहिती पालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
कोरडा दिवस पाळा
साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवडय़ातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे.


























































