मिठी आता ‘मैली’ होणार नाही! 500 कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे वैभव असणारी मिठी नदी स्कच्छ-सुंदर करण्यासाठी पालिकेने आता अनेक उपाययोजना करतानाच आता प्रवाहात जाणारे मलजल रोखण्याचा निर्णय घेतला आहे. कुर्ला येथे नदीत जाणारे दोन नाल्यांमधील मलजल भूमिगत 6 किमी टनेलने धारावीतील प्रक्रिया केंद्रात आणले जाणार आहे. 500 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आज स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

मिठी नदीचा पाणी स्वच्छ करणे, किनाऱयावर आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, सुशोभिकरण, सायकल ट्रक असे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहेत. मिठी नदी शुद्धीकरणासाठी काही ठिकाणी मलजल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कुर्ला येथील सफेद पूल आणि बापट नाला थेट मिठी नदीत मिळतो. त्यामुळे या नाल्यातील मलजल मिठीनदीत जाण्यापासून रोखण्यासाठी 6.7 किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. भविष्याची गरज ओळखून 2051 पर्यंतचा दिवसाला अंदाजित 168 दशलक्ष लिटर मलजल प्रवाह लक्षात घेऊन हा बोगदा बांधण्यात येणार आहे. 2.6 मिटर व्यासाचा आणि 6.5 किलोमिटर लांबीचा बोगदा बांधण्यासाठी तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच इतर कर पकडून हा खर्च 604 कोटी पर्यंत जाणार आहे.

  • बोगद्याची लांबी – 6.7 किलो मीटर
  • बोगद्याचा व्यास – 2.6 मीटर
  • शाफ्टचा अंतर्गत व्यास – 10 मीटर
  • 48 महिन्यांत काम पूर्ण होणार

कांदळवनाखालून जाणार बोगदा

कुर्ल्यापासून धाराकीपर्यंत जाणारा हा बोगदा कांदळवनाच्या खालून जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नाही.मात्र या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला पर्यावरण विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

प्रस्तावाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा

  • रस्तेदुरुस्तीच्या घोटाळ्यात पालिकेने 2016 मध्ये जे. कुमार या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकत दंड ठोठाकला होता. त्यावर जे. कुमार कंपनीने न्यायालयात आव्हान दिले. त्यावर याबाबत फेर आढावा घेण्याचे निर्देश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले होते.
  • त्यानुसार पालिकेने जे. कुमार या कंपनीचा काळ्या यादीचा कालावधी तीन वर्षांवर आणला. मात्र दंडाच्या रकमेत वाढ केली होती. जे. कुमार यांचा काळ्या यादीतील कालावधी 2019 मध्ये संपला आहे.
  • त्यामुळे आता कायदेशीररीत्या ही कंपनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. हा प्रस्ताव सर्वपक्षीयांच्या पाठिंब्याने मंजूर करण्यात आला.