नक्षली हल्ल्यात नांदेडचा सुपुत्र शहीद, नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्र, बुलेटप्रूफ जॅकेट पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील नारायणपूर या जिल्ह्य़ात कडेपेटा येथे नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाचे दोन जवान शहीद झाले असून त्यापैकी एक सुधाकर शिंदे हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्हय़ाचे सुपुत्र आहेत. शहीद झालेला दुसरा जवान पंजाबातील आहे. नक्षल्यांनी जवानांची शस्त्र्ाs तसेच बुलेटप्रूफ जॅकेटही पळवले.

छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित नारायणपूर भागात कडेपेटा येथे आयटीबीपीची छावणी आहे. दुपारी या छावणीतील जवान गस्तीवर निघाले होते. छावणीपासून सहा कि.मी. अंतरावर असताना नक्षल्यांनी या पथकावर हल्ला चढविला. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे व असिस्टंट सब इन्स्पेक्टर गुरुमुखसिंह हे शहीद झाले.

अस्टिटंट कमांडंट सुधाकर शिंदे हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हय़ातील मुखेड तालुक्याच्या बामणी गावचे रहिवासी आहेत. परभणी येथील कृषी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 2000 मध्ये ते इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात भरती झाले. 2019 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगड येथे नक्षल प्रतिबंधक पथकात झाली. सुधाकर शिंदे यांच्या मृत्यूची वार्ता येताच बामणी गावावर शोककळा पसरली. शिंदे यांचे पार्थिव शनिवारी विमानाने नांदेड येथे येणार असून बामणी येथे त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.